अकोला: शहराच्या तापमानात दरवर्षी प्रचंड वाढ होत आहे. जगात सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांमध्ये अकोल्याचा समावेश होतो. हे तापमान कमी करण्यासाठी वृक्षरोपण एकमेव पर्याय आहे. यासाठी ग्रीन ब्रिगेडच्यावतीने यंदा १० हजार वृक्षाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी विवेक पारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१० वर्षांपूर्वी ग्रीन ब्रिगेडची स्थापना करून वृक्षरोपण चळवळ सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे दीड लाख वृक्ष लागवड करण्यात आले असून त्यापैकी सुमारे ५० हजार वृक्ष १५ ते २० फूट उंच झाले आहेत. जगातील सर्वात उष्ण जिल्हा म्हणून अकोल्याची नोंद झाली. यावर सरकार व लोकप्रतिनिधी उपाययोजना करण्यास तयार नाही. या विषयावर संपूर्णत: दुर्लक्ष आहे, असे पारसकर म्हणाले.

हेही वाचा… चंद्रपूर: वर्षभरात १५० वाचनालयांची निर्मिती; जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

ग्रीनब्रिगेडच्या माध्यमातून पहिल्या वर्षी २०१० मधे ५०० रोपे लावली. त्यातील १०० जगली. २०११ मध्ये वर्षभरात सुमारे दोन हजार रोपे लावण्यात आली. २०१२ नंतर वृक्षारोपणाचा वेग वाढला. अकोला, पातूर, महान, बाळापूर, मूर्तिजापूर येथून पावसाळ्यात हजारो वृक्षारोपण झाले. २०१३ मध्ये आणखी त्यात भर पडली. ट्रॅक्टरमधून घरोघरी रोपे वाटली. वृक्षारोपणाच्या चळवळीला वेग आला.

हेही वाचा… ५३ हजार १३६ कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा

सामाजिक जाणीव मनात बाळगून वृक्षारोपण केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वृक्षारोपण करताना मंदिरे, शाळा, स्मशानभूमि, बुद्धविहार, सार्वजनिक बगीचे व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आल्याचे विवेक पारसकर यांनी सांगितले.

यंदा ९ जुलैला स्व. लतिका रामराव पारसकर यांच्या जयंतीनिमित्त १० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. यात आठ हजार रोपे कडू बदाम, तर दोन हजार बेल पत्त्याची रोपे आहेत. बेल पत्त्याची रोपे ही घराला अंगण व कुंपण असणार्‍या स्त्रियांना वाटप केली जातील. त्यामुळे सर्व वृक्षारोपण होईल. सुमारे पाच फूट उंचीची कडू बदामची रोपे विविध ठिकाणी लावली जात आहेत. या रोपांची काळजी घेण्याची जबाबदारी विविध वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वीकारली. कडू बदामची रोपे जनावर खात नसल्याने त्यातील किमान ९० टक्के वृक्ष जगतील, असा विश्वास पारसकर यांनी व्यक्त केला.

या वृक्षारोपण संकल्पास अकोल्यातील नागरिकांची साथ मिळाल्यास त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस किंवा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये होऊ शकेल, असे ते म्हणाले. या वृक्षारोपणाच्या महासंकल्पात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

वृक्षदिंडीतून जनजागृती

वृक्षारोपणाच्या महासंकल्प अभियानाची जनजागृती करण्यासाठी जुने शहर भागातून २ जुलैला वृक्ष दिंडी व त्यानंतर होमहवन देखील करण्यात येणार असल्याची माहिती पारसकर यांनी दिली.

Story img Loader