नागपूर: ‘काॅम्प्रेसर’च्या स्फोटात हाताच्या पंजाचे दोन भाग झालेला रुग्ण नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचाराला आला. येथील प्लास्टिक सर्जरी विभागाने गुंतागुंतीची हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून त्याचा पंजा पुन्हा जोडला.
पुसदच्या शनी मंदिराजवळ मोटारसायकल दुकानात हवा भरण्याचे काॅम्प्रेसर ठेवले होते. येथे १३ ऑक्टोबरला वाहनात हवा भरताना काॅम्प्रेसरचा स्फोट झाला. त्यात ३८ वर्षीय व्यक्तीच्या हाताचा अर्धा पंजाच शरीरापासून वेगळा झाला. त्याला तातडीने प्रथम जवळच्या खासगी रुग्णालय व त्यानंतर इतर रुग्णालयात हलवले गेले.
हेही वाचा… नागपूर: ‘सॉरी पप्पा, काश मैंने आपकी बात….’ एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
तेथून डॉक्टरांनी नागपूर एम्सला संपर्क केला. यावेळी एम्सला वैद्यकीय चमू तैनात होती. येथील प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. धनंजय नाकाडे, डॉ अल इकयान फिदवी यांच्यासह डॉ. नताशा, डॉ ओम शुभम असई, डॉ. अविनाश प्रकाश आणि इतरांनी एकत्र येत इतर विभागाच्या मदतीने प्रथमच येथे हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेत दोन्ही हाताच्या पंजातील रक्तवाहिन्यांसह इतरही बरेच लहान-मोठे भाग सूक्ष्मरित्या जोडण्याचे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते. परंतु, येथील डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वी केल्याने आता रुग्ण बरा होत आहे. रुग्णाचा जोडलेल्या पंजाचा अंगठा फारसा सक्रिय झाला नसला तरी इतर चार बोट काही प्रमाणात सक्रिय होण्याची आशा आहे.
रुग्ण एम्सला आल्यावर त्यावर प्लास्टिक सर्जरी आणि इतर विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली गेली. या शस्त्रक्रियेची सोय झाल्याने निश्चितच इतर रुग्णांना लाभ होईल. एम्सचे संचालक डॉ. हनुमंथा राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांची मदत व मार्गदर्शन महत्त्वाचे होते. – डॉ. अल इकयान फिदवी, प्लास्टिक सर्जरी विभाग. एम्स.