नागपूर : पाळीव प्राण्यांच्या पोटात प्लास्टिकसह इतर घातक वस्तू आढळणे, हे नित्याचेच झाले आहे, परंतु वन्यप्राण्यांच्या पोटातही अशा वस्तू आढळल्याने प्लास्टिकच्या भस्मासुराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या महिन्यात ‘द जर्नल फॉर नेचर कॉन्झर्वेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून चिंतेची बाब उघड झाली. उत्तराखंडच्या जंगलात हत्तींच्या विष्ठेत प्लास्टिक आणि इतर मानवनिर्मित साहित्य आढळले. उत्तराखंड वनविभागातील लालधंग, गैंडीखाटा, श्यामपूर तसेच कोटद्वार येथून हत्तीच्या विष्ठेचे नमुने गोळा करण्यात आले. यातील एकतृतीयांश नमुन्यांमध्ये मानवनिर्मित कचरा आढळला. त्यातील ८५ टक्के कचरा प्लास्टिकचा होता. संरक्षित क्षेत्रात जंगलाच्या काठापासून तीन किलोमीटपर्यंत गोळा केलेल्या विष्ठेच्या नमुन्यांत दुप्पट प्लास्टिकचे कण आढळले.
हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीच्या ट्रान्स-हिमालयीन लँडस्केपमधील लाल कोल्ह्यांच्या विष्ठेत मानवनिर्मित कचरा आढळला. चेन्नईतील िगडी राष्ट्रीय उद्यानात सुटका केलेल्या अनेक हरणांचा मृत्यू प्लास्टिक पोटात गेल्यामुळे झाल्याचा संशय होता.
माणूस कारणीभूत
प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले आणि न खाल्लेले अन्न लोक कचऱ्यात फेकून देतात. ते अन्न वन्यप्राणी भक्षण करतात. त्यामुळे हे अन्न त्यांच्यासाठी धोकादायक ठरते. यापूर्वीही कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील काही वस्तूंचे वन्यप्राणी भक्षण करीत असल्याचे उघडकीस आले होते. गेल्या दोन दशकांत हे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत.
धोकादायक
विष्ठेतून बाहेर पडणारा मानवनिर्मित कचरा इतरही वन्यप्राण्यांसाठीही धोकादायक ठरू शकतो. हत्तीच्या विष्ठेत प्लास्टिक आणि पर्यावरणपूरक नसलेल्या वस्तू पाहणे भयंकर होते, असे या अभ्यासाच्या मुख्य लेखिका गीतांजली कटलम यांचे म्हणणे आहे. जंगलालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून हत्ती काही वस्तू खात असल्याची माहिती होतीच, असे कटलम यांचे मार्गदर्शक सौम्य प्रसाद यांनी सांगितले.