मुलाला स्वच्छतागृहात डांबले

देशातील अग्रगण्य प्ले स्कूल असलेल्या बचपन प्ले स्कूलच्या स्वच्छतागृहात एका अडीच वर्षांच्या मुलाला डांबण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुलाच्या पायाला दुखापत झाली असून त्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी रमना मारोती येथील शाळेची शाखा व अज्ञात कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

क्षितिज मनोहर इंगळे (३०) रा. रमना मारोती यांच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा निझीर नावाचा अडीच वर्षांचा मुलगा या शाळेत शिकतो. गेल्या ३० ऑगस्टला सकाळी ९ वाजता त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. तो स्वच्छतागृहात गेला असता कुणीतरी दार बंद केले. त्यामुळे त्याच्या पायाच्या अंगठय़ाला दुखापत झाली. दुपारी १२ वाजता क्षितिज मुलाला घ्यायला शाळेत गेले असता हा प्रकार समोर आला. त्यांनी शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर चौकशी करून शाळा व अज्ञात कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. बचपन प्ले स्कूल ही प्ले स्कूलची साखळी असून देशातील २५ राज्यातील ४०० शहरात संस्थेच्या १ हजार १०० शाखा आहेत. त्यात १ लाख मुले शिकतात. चिमुकल्या मुलांचा लहान वयापासून योग्य विकास व्हावा, यासाठी पालक मुलांना शाळांमध्ये पाठवतात. त्यामुळे शिक्षकांनी मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता असून असे प्रकार पुन्हा घडायला नकोत, अशी प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.