ज्योती तिरपुडे
सहल, संमेलन, सिनेमा अन् गटचर्चाचे आयोजन; नात्यांच्या पलीकडे जाऊन स्नेहाबंधाची जपणूक
कुठल्याशा कारणावरून आयुष्याच्या जोडीदाराने वेगळी वाट निवडली, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलता-पेलता लग्नाचे वय कधी निघून गेले कळलेच नाही, अशा विविध प्रसंगांमुळे एकटय़ाने आयुष्य जगणाऱ्या अनेक महिला आहेत. परंतु हा असा एकल प्रवास अनेकदा नैराश्याने भरलेला असतो. आयुष्यातील वेदनादायी प्रसंगात हा एकटेपणा खायला उठतो. ही रिक्तता भरून काढण्यासाठी काही कल्पक महिलांनी एकत्र येत ‘सपोर्ट ग्रुप’ तयार केले. हे ‘सपोर्ट ग्रुप’ आता या महिलांच्या जीवनाचा एक भाग झाला असून त्यातून या महिलांनी सहजीवनाचा नवा आनंदमार्ग शोधून काढला आहे.
जगभरात एकटय़ा राहणाऱ्या महिलांची संख्या वाढत असून त्याला नागपूरही अपवाद नाही. एकटय़ा राहत असताना दैनंदिन किंवा इतर गरजांसाठी एकमेकींचा आधार म्हणून त्यांनी गट, संघटना स्थापन करून आयुष्य समृद्ध करीत समर्थपणे जगण्याचा शोध सुरू केला आहे. यामध्ये विधवा, परितक्तया, अविवाहित, घटस्फोटित, नवरा असूनही स्वतंत्र राहणाऱ्या अशा कितीतरी महिला आहेत. शिवाय मुलांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. वेगवेगळ्या कारणास्तव एकटय़ा राहणाऱ्या महिलांसमोर आव्हानेही मोठी आहेत. कधी नातेवाईकांच्या सहाय्याने तर कधी मित्रमैत्रिणींची मदत घेऊन एकल महिला समस्यांना तोंड देत असतात. नागपूर महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात एकल महिलांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत तर १७ लाख महिला नवऱ्याविना मुलांचा सांभाळ करीत असतात. भारतातही ७४ लाख महिला एकटय़ा राहतात. एकटय़ा महिलांच्या संदर्भात श्रीमोयी पीटू कुंडूने लिहिलेल्या ‘दी ट्रथ अबाऊट बीइंग अ सिंगल विमेन इन इंडिया’ हे पुस्तक महिलांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी चांगलेच गाजले. पूर्वीही भीसी ग्रुप, महिला मंडळे असायची. आताही ती आहेत पण, आपण एकमेकींना पडत्या काळात आधार देण्याचे काम करू असा भाव त्यात नाही. कारण, आर्थिक किंवा धार्मिक गरजेतून महिलांचे गट तयार झालेले असतात. त्यामुळे आता ‘सपोर्ट ग्रुप’ तयार होत असून याद्वारे परस्परांना भावनिक आधार देणे, व्यक्त होणे, स्वत: आनंद घेणे आणि त्यात इतर महिलांनाही सामावून घेणे, असे भावनिक बंध घट्ट करणारे सहजीवन या महिला जगत आहेत. असे सहजीवन जगणाऱ्या महिलांचे ग्रुप नागपुरातही आहेत. त्यातही मुलांसोबत राहणाऱ्या आणि एकटय़ा राहणाऱ्या अशी एक वर्गवारी आहे.
एकल महिलांची संख्या वाढतेय
भारतीय संस्कृतीत लग्न ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. भारतात ७४ लाख महिला एकटय़ा राहतात. त्यात अविवाहित, घटस्फोटित, वेगळ्या राहणाऱ्या, विधवा अशा महिलांचा समावेश असून त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १२ टक्के असल्याचे २०११च्या जनगणनेवरून स्पष्ट होते. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा आकडा तिपटीने वाढला असून ३९ टक्के एकल महिला असल्याचे सांगण्यात येते.
सुनीता झाडे, सुरभी सिरसीकर आणि मी सहज बोलत असताना एकटय़ा राहणाऱ्या महिलांना एकत्र आणण्याची कल्पना डोक्यात आली. ज्यांच्या आयुष्यात मुले किंवा आईवडील आहेत, पण लाईफ पार्टनर नाही, अशा स्थितीत खूपदा सोबतीची गरज असते आणि सोबतीला कोणीच नसते. त्यामुळे एकल महिलांचा एक ‘सपोर्ट ग्रुप’ करायचे ठरले. यासंबंधीची ५० महिलांची पहिलीच बैठक २६ मार्च २०१६ला माझ्या अभ्यंकरनगरातील घराच्या वाहनतळात घेतली. मीडियाने खूप सहकार्य केले. त्यानंतर आर्थिक सक्षम, नोकरी करणाऱ्या, सेवानिवृत्त महिलांची यादी केली. परंपरेत अडकून राहण्यापेक्षा त्यातून मोकळे होणे हाही ग्रुप निर्माण करण्यामागचा उद्देश होता.
– वर्षां बाशू, डिअर वन्स ग्रुप