बुलढाणा: अपारंपरिक कृषी पंपाना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान कुसुम योजनेला कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात थंड प्रतिसाद मिळाला आहे. यातच त्रुटींमुळे हजारो शेतकऱ्यांचे अर्ज रखडले असल्याचे वृत्त आहे. विद्युत व इतर पारंपरिक ऊर्जेवर आधारित कृषी पंपाना पर्याय म्हणून सौर पंप देण्याचे प्रावधान योजनेत आहे. यासाठी महाऊर्जा च्या पोर्टल वर शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
हेही वाचा >>> बुलढाणा: चार दिवस पावसाचे… हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…
जिल्ह्यातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या सुमारे सहा लाख आहे. या तुलनेत कुसुम पोर्टल वर जिल्ह्यातील जेमतेम २४ हजार ९८७ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मात्र आजवर केवळ २३३२ शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळाला आहे. तब्बल २ हजार५२८ अर्ज त्रुटींमुळे रखडले आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी २४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र वरील तोकडी आकडेवारी लक्षात घेता योजनेला थंड प्रतिसाद मिळाला हे स्पष्ट होते.तसेच या उपयुक्त योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार-प्रचार करण्यात यंत्रणा कमी पडल्या असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.