अविष्कार देशमुख

विविध पेट्रोलपंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेले उज्ज्वला गॅस योजनेचे जाहिरात फलक  तातडीने बदलले जात आहेत.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अनेक जण पेट्रोलपंपांवरील मोदींच्या फलकासमोर निदर्शने करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपुरातील एका  पेट्रोलपंपांवर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीवरून मोदींच्या संदेशाचे विडंबन करणारे फलक लावले. या निदर्शनांचा धसका घेऊन हे फलक बदलले जात असल्याची माहिती आहे.

सध्या अनेक  पेट्रोलपंपांवर  पंतप्रधानांचे छायाचित्र असलेले  उज्ज्वला गॅस योजनेचे जाहिरात फलक आहेत. मात्र दिवसागणिक घरगुती गॅस व  पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने पंतप्रधानांचे छायाचित्र असलेल्या याच फलकांसमोर नागरिक आपला संताप व्यक्त करीत आहेत. अनेक जण फलकावरील मोदींना हात जोडून छायाचित्र काढत आहेत. नागपुरातील काही पेट्रोलपंपावरील मोदींच्या फलकासमोर तर चक्क फुले वाहण्यात आली. यावर अनेक ‘मिम्स’देखील तयार होत आहेत. नागपूरसह अनेक शहरात असे प्रकार घडत असल्याने तातडीने हे जाहिरात फलक बदलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आता इंधनाचे जाहिरात फलक काढून त्याठिकाणी  करोनाशी लढताना कोणती खबरदारी घ्यावी, हे सांगणारे  मोदींचे फलक लावले जात आहेत.

पेट्रोलपंपावर जाहिरात फलक लावण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्थानिक तेल वितरण कंपन्यांना आदेश येतात. त्यानंतर तेल कंपन्या तसे फलक आपल्या  पेट्रोलपंपांवर लावतात. त्यामुळे सध्या जे काही फलक बदलण्यात येत आहेत ते देखील पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसारच सुरू आहे.

– गुणवंत देशमुख, वितरण अधिकारी, इंडियन ऑईल.

Story img Loader