राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे घेऊन दगाफटका केल्याचा आरोप केला, त्यावर राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेत काहीच तथ्य नाही. संजय राऊत आणि अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांची नुकतीच भेट झाली. राऊत यांच्याबाबत आमची कुठलीही नाराजी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात केलेल्या घोषणेचं स्वागतही केलं.
अमरावती येथील अंबादेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, मी मंदिरात काहीच मागायला येत नाही. केवळ आभार मानायला येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी घेतले जात आहे, याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. मी एका संघटनेत काम करते, खासदार असल्याने वैयक्तिक मताचा फार कमी अधिकार असतो. जर काँग्रेसने शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला असेल, तर मी काँग्रेस पक्षाचे आभार मानते.
येत्या दीड वर्षांत दहा लाख शासकीय नोक-या देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशातील नव्या पिढीला नोक-या मिळणार असतील तर या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते, असेही सुळे म्हणाल्या.
विधान परिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असा दावा भाजपने केला आहे, त्याबद्दल सुळे म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांपासून भाजपचे नेते तारखांवर तारखा देत आहेत. पण, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावल्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, हे दडपशाहीचे सरकार आहे, विरोधात बोलणा-या लोकांवर अशा पद्धतीने कारवाई करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.