नागपूर: भाजपचे स्टार प्रचारक व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्टातील विदर्भातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. १० एप्रिलला त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हानमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात नागपूर, गडचिरोली, भंडारा -गोंदिया, रामटेक व चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी रामटेकमध्ये शिंदे गटाचा तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे खासदार होते. उर्वरित तीन ठिकाणी भाजपचे विद्यमान खासदार आहेत. पूर्व विदर्भ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. ‘मिशन-४५’ अभियानानुसार भाजपने या सर्व जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते येणार आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतरही नेत्यांचा समावेश आहे.

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर निवडणूक रिंगणात, अमरावती मतदारसंघातील लढत वेगळ्या वळणावर

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची सुरुवात मोदी महाराष्ट्रातील विदर्भातून करणार आहेत. त्यासाठी त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवड केली आहे. अयोध्येतील मंदिरात मोदींच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाजपने देशभर आनंदोत्सव साजरा केला होता. रामटेकसुद्धा श्रीरामाच्या वास्तव्याने पुनित झालेले शहर आहे. येथील गडमंदिर देशभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोदी यांच्या सभेला विशेष महत्व आहे. भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींच्या दौऱ्याची प्राथमिक स्वरुपाची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता त्यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे जाहीर सभा होणार आहे. मोदी गडमंदिराला भेट देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अशोक चव्हाणांचा महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्याचा प्लॅन; नाना पटोलेंच्या गौप्यस्फोटाने खळबळ

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

अमित शहा सहाला येणार

केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची सहा एप्रिलला गोंदिया येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या विभागीय कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार शहा यांची ६ एप्रिलला गोंदियात जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी ते दुपारी ३ वाजता विमानाने दिल्लीहून नागपूर येथे येणार असून येथून ते हेलिकॉप्टरने गोंदियाला जाणार आहे. तेथे ४ वाजता जाहीर सभा आहे.

Story img Loader