प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले. नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे उद्घाटन तसेच समृद्धी मार्गाचे लोकापर्ण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते तब्बल ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण केलं जाणार आहे. केवळ एक तास पंतप्रधान मोदी नागपूरमध्ये असतील. मात्र या एका तासाच्या दौ-यात त्यांच्या हस्ते जुन्या प्रकल्पाचे लोकार्पण, पूर्ण झालेल्या प्रकल्पाचे उदघाटन आणि नव्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे.
मोदींच्या व्हिजनचा भाग
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत. नागपूर आणि मुंबईला जोडणारा हा महामार्ग पंतप्रधान मोदींच्या देशभरातील महत्त्वाची शहरं दळणवळणाऱ्या माध्यमातून जोडण्याच्या धोरणांचा भाग असल्याचं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान मोदींच नागपूर विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं.
२४ जिल्ह्यांना फायदा होणार असा दावा
“७०१ किलोमीटरचा हा महामार्ग ५५ हजार कोटी खर्च करुन बांधण्यात आला आहे. हा भारतामधील सर्वात लांब पल्ल्याच्या महामार्गांपैकी एक आहे. हा महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधून जातो. हा महामार्ग अमरावती, औरंगाबाद आणि नाशिकमधील महत्त्वाच्या भागांना जोडतो. या महामार्गाच्या आजूबाजूच्या १४ जिल्ह्यांना जोडण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प फार महत्तवाचा आहे. एकूण २४ जिल्ह्यांना या महामार्गाचा फायदा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. सकाळी १०;४५ वाजता पंतप्रधान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आणि महामार्गाचा दौरा करतील.
नक्की पाहा हे फोटो >> फडणवीसांनी चालवलेल्या आलिशान Mercedes-Benz कारची किंमत पाहून व्हाल थक्क! ९ गेअर, ९ एअरबॅग, BJP कनेक्शन अन्…
नागपूर मेट्रोचंही लोकार्पण
पंतप्रधान सकाळी ९;३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. सुमारे १० वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवासाला सुरुवात केली. या प्रवासानंतर ते ‘नागपूर मेट्रो टप्पा एक’ राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -दोन’ ची पायाभरणीही करतील.
एम्स, रेल्वे, संशोधन केंद्र
सकाळी ११.४५ वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूरचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्याच बरोबर १५०० कोटींचा राष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी, राष्ट्रीय वन हेल्थ संस्था (एनआयओ ), नागपूर आणि नागपुरातील नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाची पायाभरणीही करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (सीआयपीईटी) संस्था, चंद्रपूर’ राष्ट्रार्पण आणि ‘हिमोग्लोबिनोपॅथी संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण केंद्र, चंद्रपूर’ चे लोकार्पण करणार आहेत.
नक्की वाचा >> पाच तासांत फडणवीस-शिंदेंचा ५३० किमी प्रवास; ‘समृद्धी महामार्गा’वर स्पीड लिमिट किती? सर्वसामान्यांना या वेगाने जाता येणार?
वाहतूकीमध्ये बदल
याव्यतरिक्त शहरात आयोजित विविध कार्यक्रमांना पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींसोबत राज्यपाल, मुख्यमंत्री आदी अतिमहत्वाच्या व्यक्तींचे शहरात आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीकोणातून नागपूर शहरातील वाहतूकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. मोदी ज्या मार्गावरुन जाणार आहेत त्या मार्गावर विविध ठिकाणी ‘बँरीकेडींग’ करून वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे.