नागपूर : राजकीय मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोदींच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. ‘‘देशाच्या इतिहास संवर्धनात आपण मोलाची भूमिका बजावली’’, अशा शब्दात त्यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पवारांच्या निमंत्रणावरून मोदी आले होते. त्याबद्दल आभार मानण्यासाठी पवारांनी जे पत्र मोदींना लिहिले त्यात त्यांनी मोदींच्या भाषणालाही ‘अभ्यासपूर्ण’ संबोधले.

फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीतील विज्ञान भवनात साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन करण्याची विनंती पवारांनी मोदींना केली होती. या विनंतीला मान देवून मोदी संमेलनाला आले. त्याबद्दल मोदींबाबत कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र पवारांनी लिहिले. या पत्रात पवार म्हणतात, देशाचा पंतप्रधान साहित्य संमेलनाला आल्याने संमेलनाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून तुम्ही जे भाषण केले ते प्रगल्भ आणि अभ्यासपूर्ण होते. त्यामुळे हे भाषण जगभरातील मराठी लोकांच्या मनाला भावले.

‘विशेष स्नेहा’साठीही आभार

या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी पवारांना खुर्चीवर नीट बसता यावे, यासाठी मोदी यांनी त्यांना मदत केली होती. सोबतच स्वत:च्या हाताने पवारांपुढील ग्लास ओढून त्यात पाणी ओतले होते. मोदींच्या या ‘विशेष स्नेहा’साठीही पवारांनी या पत्रात त्यांचे आभार मानले.

तालकटोऱ्यात मराठी योद्धयांचे अश्वारूढ पुतळे हवेत

साहित्य संमेलन जिथे पार पडले त्या तालकटोरा स्टेडियमच्या ठिकाणी पेशवा बाजीराव पहिला, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांनी दिल्लीतील पहिला तळ ठोकला होता. या महान मराठी योद्धयांची आठवण जपण्यासाठी त्यांचे अर्धपुतळे या ठिकाणी बसवण्याचा प्रस्ताव सरहद या संस्थेेने मांडला होता. त्याचा संदर्भ देत पवारांनी अर्धपुतळे नको तर या योद्धयांच्या शौर्याला शोभणारे अश्वारूढ पुतळे उभारण्यासाठी नवी दिल्ली महापालिका व दिल्ली सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे, अशी विनंती या पत्रात केली आहे. सोबतच भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा सन्मान आणि जतन करण्यात तुमचे नेतृत्व नेहमीच महत्त्वाचे राहिले, अशा शब्दात मोदींचा गुणगौरव केला आहे.

Story img Loader