वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबर रोजी वर्ध्यात येत आहेत. येथील स्वावलंबी मैदानावर त्यांची सभा होत असून विश्वकर्मा मेळाव्यास ते संबोधित करतील. यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू असून शहराचे रुपडेच बदलत आहे. सभास्थळी जाणारे सर्व मार्ग चकाचक होत असून आजवर नं निघालेले सर्व अतिक्रमण जमीनदोस्त केल्या जात आहे. रस्ते दुभाजकांची रंगरंगोटीही होत आहे. हा पूर्णतः शासकीय कार्यक्रम असल्याचे सांगितल्या गेल्याने भाजपा नेते व लोकप्रतिनिधी जबाबदारीमुक्त म्हणून शांत असल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> राहुल गांधींच्‍या जिभेला चटकेच दिले पाहिजे….. आमदार  गायकवाडांनंतर आता  भाजपच्या ‘या’ नेत्याने थेट…..

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा…

पंतप्रधान मोदी यांचा कार्यक्रम शासकीय व केंद्रीय मंत्रालयाने आखला आहे. पण सभेच्या गर्दीचे काय, हा प्रश्न पुढे आला. जिल्हा प्रशासनाने स्वतः ती जबाबदारी घेतली आहे. विश्वकर्मा समुदायतील २० हजार, स्टार्टअपचे उद्योजक व आयआयटीचे विद्यार्थी निमंत्रित आहेत. ५० ते ६० हजारांच्या उपस्थितीचे नियोजन आहे. पण हे नियोजन पुरेसे का, असा प्रश्न काही भाजपा पदाधिकाऱ्यांना पडला. या अनुषंगाने आज दिवसभर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या लागत असलेल्या हजेरीकडे पाहिल्या जाते. ते सकाळी ११ वाजता हिंगणघाट येथे, दुपारी वर्धा व सायंकाळी देवळी, अशा तीन विधानसभा क्षेत्रांत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे वेळापत्रक आले आहे. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणाले की, बावनकुळे यांचा दौरा व मोदी यांचा कार्यक्रम याचा परस्पर संबंध नाही. तशी सूचनाही नाही. निवडणूक आढावा स्वरूपात चर्चा आहे. पण वेळेवर काही बाबी चर्चेत येवू शकतात.

हेही वाचा >>> Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

उपस्थिती हा मुद्दा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम भव्य स्वरूपात व्हावा, अशी वरिष्ठ भाजपा नेत्यांची सुप्त भावना आहे. मात्र पक्षीय पातळीवार स्पष्ट सूचना नसल्याचे सांगण्यात येते. अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर कोणाला स्थान मिळणार, हे निश्चित झालेले नाही. केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे असतील का, ही बाब अधिकृत घोषित झालेली नाही. तसेच स्थानिक पातळीवरील पक्षीय आमदारांना स्थान मिळणार का, याबाबत दुजोरा मिळालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेचा पुढील विधानसभा निवडणुकीसाठी लाभ घेण्याचा हेतू नाकारता येणार नाही, असे सूचक विधान एका नेत्याने केले. यापूर्वी मोदी हे दोन्ही लोकसभा निवडणूक प्रचारासाठी वर्ध्यात येऊन गेलेले आहेत. भाजपचे लोकसभा क्षेत्र प्रभारी सुमित वानखेडे म्हणाले की, पक्षीय पातळीवर सूचना नाही. पण पंतप्रधान मोदी यांचे आकर्षण असल्याने लोक स्वयंस्फूर्तीने जाणार असल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi in wardha on september 20 on occasion of one year of the pm vishwakarma yojana pmd 64 zws