अकोला : वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद घेतला. नंगारा भवनात पंतप्रधान मोदींसमारे बंजारा समाजाच्यावतीने परंपरागत नृत्य देखील सादर करण्यात आले. बंजारा नृत्य व संग्रहालयाचे मोदींनी अवलोकन केले.
वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा भवन हे भव्य संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाच्या लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम नांदेड येथे विमानाने आगमन झाले. त्यानंतर ते हेलिकॉप्टरद्वारे पोहरादेवी येथे दाखल झाले. पोहरादेवी येथील मॉ जगदंबा देवीच्या मंदिराला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी दर्शन घेतले. संत श्री सेवालाल महाराज, संत श्री रामराव महाराज यांच्या समाधीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नतमस्तक झाले. नंगारा वास्तू संग्रहालयाचे नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.
हे ही वाचा…हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात दिरंगाई, दोन पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस
बंजारा समाजाचे प्राचीन वाद्य नगारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्साहात वाजवला. यावेळी परंपरागत बंजारा समाजाच्या वेशभूषेत प्राचीन नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण नंगारा वास्तू संग्रहालयाचे सुक्ष्मपणे निरीक्षण केले. नंगारा भवनाचे भव्य दिव्य स्वरूप असून मोठी गॅलरी आहे. या भवनाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वास्तू संग्रहालय परिसरात बंजारा समाजाच्या प्राचीन वास्तूचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला सुद्धा नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन पाहणी केली. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे बंजारा समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
हे ही वाचा…गाजियाबादचे पडसाद थेट अमरावतीत…जमाव पोलीस ठाण्यात धडकला आणि दगडफेक….
नंगारा भवनाचे २०१८ मध्ये भूमिपूजन
युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नंगारा वास्तू संग्रहालयाला मंजुरी मिळाली होती. डिसेंबर २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या सोहळ्यातूनच त्यावेळी निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पावणे सहा वर्षांत ही भव्य वास्तू उभारण्यात आली. आता पुन्हा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंगारा भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.