नागपूर : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा झाली असून आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे नागपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभेचे उमेदवार राजू पारवे आणि भंडारा-गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ मोदींची सभा होणार आहे.
या सभेसाठी नागपूर, भंडारा, गोंदिया येथून नागरिक येत आहे. नागरिकांशी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असता त्यांनी राम मंदिर आणि ३७० कलम हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्थन देत असल्याचे सांगितले. बेरोजगारी कमी करण्यास आणि महागाई नियंत्रित करण्यात मोदी अपयशी झाले. शेतकऱ्यांच्या मालाला हवा तसा भाव देऊ शकले नाही. मात्र, हिंदूचे राष्ट्र निर्माण करायचे असेल तर मोदीच हवे अशी प्रतिक्रिया काही तरुणांनी दिली. मोदी सरकारमुळेच राम मंदिर उभे राहू शकले, अशीही प्रतिक्रिया काहींनी दिली.
ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना विचारणा केली असता त्यांच्या भागात राम मंदिराचा मुद्दा फार प्रभावी नाही असे सांगितले. त्यांच्या शेतमालाला अधिक भाव हवा अशी त्यांची मागणी आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कामगिरीवर काहींनी नाराजीही व्यक्त केली. मात्र, मोदी हे भ्रष्टाचारी नसल्याने त्यांनाच निवडूण देणार असाही काहींचा सूर होता.
मोदींची सभा महत्त्वाची का?
रामटेक मतदारसंघाला तसे ऐतिहासिक महत्त्व आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, काँग्रेसचे नेते मुकूल वासनिक यांनीही येथून निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसचा गड असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने सलग दोनदा निवडून आले. त्यामुळे ही जागा भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची आहे. या जागेसाठी कृपाल तुमाने इच्छुक होते. मात्र, काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेना शिंदे गटाने येथून उमेदवारी जाहीर करताच पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपसाठीही रामटेकची जागा प्रतिष्ठेची झाली आहे.
हेही वाचा – अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेसमधून मी बाहेर पडल्याने फरक…”
नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या मध्यभागात कन्हान शहर आहे. तर बाजूला भंडारा जिल्ह्याची सिमाही सुरू होते. त्यामुळे येथे होणारी सभा तीनही लोकसभेसाठी फायद्याची ठरण्याची चर्चा आहे. याशिवाय रामटेक शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. भाजपच्या प्रचार यात्रा आणि सभांमधून राम मंदिर प्रतिष्ठापणेचा विषय प्रामुख्याने असतो. त्यात रामटेकचे गडमंदिर हा अनेकांसाठी आस्थेचा विषय आहे. त्यामुळे रामटेकच्या नजिक असलेल्या कन्हान शहराची सभेसाठी निवड करण्यात आली आहे. या सभेमध्ये मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.