नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी स्थापनेपासून संघाने देश आणि समाजाच्या रक्षणाचे कसे कार्य केले. भारतीय संस्कृती कशी टीकवली यावर मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतावर शेकडो वर्ष परकीय आक्रमन झाले. अनेक क्रुर आक्रमकांनी आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीयत्वाची मूळ जाणीव कधीच कुणी संपवू शकला नाही. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची ज्वाला कायम तेवत ठेवण्यासाठी देशात अनेक चळवळींनी काम केले. त्यात भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे. आमच्या देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीच विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याचे काम केले. समाजामध्ये असलेली दुरी संपवून सर्वांना एका सूत्रांमध्ये बांधण्याचे काम भक्ती आंदोलनाने केले.

संघाविषयी नेमके काय म्हणाले मोदी?

परकीय आक्रमनानंतर स्वामी विवेकानंद यांनी युवकांना जागृत करत त्यांच्यामध्ये राष्ट्रभावनेची जाणीव करून दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला असताना अशा काळातच डॉ. केशव हेडगेवार यांनी देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांनी शंभर वर्षांआधी लावलेले बीज आज एक वटवृक्षामध्ये रुपांतरीत झाले आहे. संघाचे सिद्धांत आणि आदर्शांनी आमच्या देशातील मूळ भावनेला बळ देण्याचे कार्य केले. संघ केवळ एक वटवृक्षच नाही तर भारतीय संस्कृतीचे अक्षयवृक्ष आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जेथे सेवा कार्य तेथे संघ: मोदी

संघ शंभर वर्षांपासून राष्ट्रीय जाणीव प्रबळ करण्याचे काम करत आहे. दृष्टी आणि दिशा या दोन भिन्न गोष्टी आहेत. बाह्य आणि अंतर्गत दृष्टी आवश्यक आहे. गुलाबराव महाराज यांनी आपल्या अंतर्गत दृष्टीतून अनेक ग्रंथ लिहले. संघ हे एक संस्कार यज्ञ आहे. ते प्रत्येक स्वयंसेवकाला अशीच अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टी देण्याचे काम करते. आपले शरीर हे परोपकारासाठी आहे. सेवा संस्कारात आली की ती साधना बनते. संघाच्या अनेक पिढ्यांनी आपल्या सेवा कार्यातून संस्था उभ्या केल्या आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सिमावर्ती भाग असो की जंगल, डोंगराळ प्रदेश असो. संघाचे स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी सेवाकार्य करीत असतात. वनवासी कल्याण आश्रम, एकल विद्यालय, संस्कृती आणि गरिबी रक्षणासाठी चालणारे कार्य संघ करत आहे. त्यामुळे जेथे जेथे सेवा कार्य तेथे संघ, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. एका प्रशिक्षित शिपायाप्रमाणे संघाचे स्वयंसेवक प्रत्येक ठिकाणी सेवा देण्यास तत्पर असतात. आमच्या हृदयात सेवा बसली आहे.