नागपूर: देशात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ख-या अर्थाने मेट्रो विस्तार सुरू झाला. नागपूरलाही मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली. त्याच्या उद्घाटनाला २०१९ मध्ये पंतप्रधानांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी होकारही दिला होता. सर्व तयारी पूर्ण झाली होती.पण पावसाने घात केला आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द झाला. ज्या महामेट्रोने नागपूर मेट्रोची उभारणी केली त्याच महामेट्रोने पुण्याची मेट्रोही उभारली. या मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. येथेही ऐनवेळी पावसाने घात केला. जे नागपुरात घडले तेच पुण्यात घडले. पाऊस, मोदी आणि मेट्रो यांचा एकत्रित योग याची चर्चा सध्या मेट्रो वर्तुळात जोरात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात काय घडले होते?

सात सप्टेंबर २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो रिच – ३ चे उद्घाटन होणार होते. पण एक दिवसा आधीपासूनच नागपुरात जोरदार पाऊस सुरू झाला आणि ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला. नागपूरात पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यानचा ११ किलोमीटरच्या रिच ३ च्या टप्प्यातील प्रवासी सेवेचे उदघाटन करणार होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी सुभाषनगर मेट्रो स्टेशनवरून सीताबर्डी दरम्यान मेट्रोवारीही करणार होते. संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान मोदी हे मानकापूर क्रीडा संकुलात होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मेट्रोसह इतर अनेक प्रकल्पांशी संबंधित उद्घाटन करणार होते. मात्र, एकदिवस आधी दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला रिमझिम असलेला पाऊस दुपारी दीडच्या सुमारास दमदारपणे कोसळू लागला आणि अवघ्या दीड तासांच्या पावसानंतर नागपुरात अनेक रस्त्यांवर गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचले. लोकांच्या दुचाकी पाण्याच्या मधोमध बंद पडू लागल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या घटनाही घडल्या. दुसऱ्या दिवशी देखील नागपुरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. पावसाची तीव्रता लक्षात घेता पंतप्रधानांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले. मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : वर्धा: जलाशयातून विसर्ग, पुरस्थितीमुळे बचाव पथके सज्ज

पुण्यात काय घडले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुक्रवारी पुणे दौरा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनासह इतरही विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार होते.आता ते ऑनलाईन करण्यात आले. हवामान विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.  पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्यातील  २२ हजार ६०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार होते.  राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात होता.पंतप्रधान पुणे येथे सुमारे २९५० कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो फेज-१ च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही करणार होते. तसेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या पुणे मेट्रो उद्घाटन देखील पंतप्रधान करणार होते. या व्यतिरिक्त राज्यातील पुढील ही कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार होते.

हेही वाचा : भ्रष्ट लोकांच्या हातून पुन्हा शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी नको – भास्कर जाधव

मेट्रो, पाऊस आणि मोदी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे नागपुरात मेट्रो सुरू झाली. त्यामुळे त्याचे अप्रूप होते. भूमीपूजनाला मोदी होते. रिच-१ च्या उद्घाटनाला ते येऊ शकले नव्हते. म्हणून त्यांना रिच ३ साठी निमंत्रित केले होते. पण पावसामुळे ते शक्य झाले नाही अखेर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण आणि टप्पा २ च्या भूमीपूजनाची संधी मोदींना मिळाली व त्यानी मेट्रोतून प्रवासीही केला होता. पुण्यात सुध्दा पुढच्या काळात हेच घडण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi s nagpur visit for metro inauguration in 2019 also cancelled due to heavy rainfall cwb 76 css