नागपूर, मुंबई : बहुप्रतीक्षित नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल.
समृद्धी महामार्ग उद्घाटनाचे मुहूर्त यापूर्वी अनेकदा ठरले. मात्र, विविध कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर पडत होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण होईल, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दिले होते. त्यानुसार ११ डिसेंबरला हा सोहळा निश्चित झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकसत्ताह्णला दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस उपस्थित राहतील. महामार्गावरील वायफड नाक्याजवळ सभास्थळ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. मेट्रोच्या विमानतळ स्थानकाचा परिसरही सजवला जात आहे. तसेच जिल्हा व पोलीस प्रशासनामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
असा असेल कार्यक्रम
११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता पंतप्रधानांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळ मेट्रो स्थानकावर त्यांच्या हस्ते मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण केले जाईल आणि त्यानंतर ते समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी रवाना होतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘फुटाळा लाईट अॅण्ड साऊंड शो’चे उद्घाटन मात्र पंतप्रधानांच्या कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
पंतप्रधानांचा मेट्रोतून प्रवास? नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान विमानतळ स्थानक ते कस्तुरचंद पार्क या टप्प्यात मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष डबे असणारी मेट्रो मागवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘समृद्धी’विषयी..
* मुंबई ते नागपूर अंतर ८ तासांत पार करण्याचे उद्दिष्ट
* ७०१ किमी लांबीचा महामार्ग प्रकल्प
* अंदाजे ५५ हजार कोटी रुपये खर्च
* १० जिल्ह्यांमधील ३९० गावांना जोडणारा महामार्ग
मेट्रोतून प्रवासाचीही शक्यता
नागपूर शहरातील मेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून त्यांचेही उद्घाटन थांबले आहे. मोदींच्या या दौऱ्यात त्यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधानांचे नागपूरला आगमन झाल्यावर मेट्रोच्या विमानतळ स्थानकाहून कस्तुरचंद पार्क स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. यासाठी विशेष डबे असणारी मेट्रो मागवण्यात आल्याची माहिती आहे.