वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वर्धा दौरा आता १९ नव्हे तर २० सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान हे १९ रोजी येणार तसेच ते सेवाग्राम की स्वावलंबी मैदानावर येणार, याविषयी संभ्रम होता. तो दूर झाला आहे. वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर त्यांचा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता होईल. याच ठिकाणी पंतप्रधान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आले होते. त्यानंतर मराठी साहित्य संमेलन याच ठिकाणी पार पडले होते. आता याच मैदानावर पंतप्रधान मोदी ५० ते ६० हजार लोकांना संबोधित करणार.
असे आहे कार्यक्रमाचे नियोजन
पंतप्रधान मोदी हे विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधणार आहेत. त्यात देशभरातून २० हजार विश्वकर्मा उपस्थित राहतील. विश्वकर्मा योजना ही बारा बलुतेदार कारागीरांसाठी आहे. २० पैकी अधिकतर वर्धा जिल्ह्यातील राहणार असून त्यांच्यासाठी ७५० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानात सव्वादोन लाख वर्गफुटाची जागा तयार करण्यात येत आहे. त्यापैकी २५ हजार ही प्रशासकीय व्यवस्थेसाठी तर उर्वरित श्रोते, मीडिया, व्हीआयपीसाठी राहणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा – आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
केंद्रीय सूक्ष्म व लघु मंत्रालय याचे नियोजन करीत आहे. खात्याचे सचिव, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पाहणी केली आहे. या कार्यक्रमात निवडक कारागीरांना धनादेश व साहित्य वाटप पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केल्या जाईल. यात वर्धा जिल्ह्यातील कारागीरांचा समावेश करण्याचा प्रयत्न असून तशी माहिती घेतल्या जात आहे.
विश्वकर्मा योजना काय आहे ?
विश्वकर्मा ही केंद्र शासनाची योजना आहे. ही योजना १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोहार, सोनार, चांभार, न्हावी, धोबी अशा व अन्य १४० जातींना फायदा होणार आहे. या योजनेमध्ये कर्ज, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र तसेच औजार खरेदीसाठी १५००० रुपये पण मिळतील. व्यवसायासाठी विनातारण कर्ज उपलब्ध होते. अठरापगड जातीच्या कारागीरांच्या कलेस वाव देणे तसेच त्यांना सक्षम करणारी ही योजना असल्याचे म्हटल्या जाते. यासोबतच या ठिकाणी विविध कलाकृतीची प्रदर्शनी लागणार आहे. ती तीन दिवस राहणार. मात्र मैदान तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याबाबत पण चर्चा रंगत आहे.