वर्धा : चाणाक्ष नेते प्रसंग, उपस्थित समुदाय, परिसर याचे भान ठेवून आपले भाषण करतात असे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणातून असे संदर्भ नेहमी वापरत असल्याचे पाहायला मिळते. आज तळेगावच्या सभेत त्याचाच प्रत्यय आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय कार्याने हा परिसर पावन झाला आहे. त्यांच्या भजन व भाषनांनी इतिहास घडवीला. आष्टीचा संग्राम हे त्याचेच फलित समजल्या जाते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपल्या भाषणाची सुरवात, ‘ चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ‘ अश्या वाक्याने करीत. म्हणजे अणू रेणूत ईश्वराचा अंश आहे. ही शक्ती म्हणजेच गुरुदेव शक्ती असून त्याचे स्मरण करीत आरंभ करीत असल्याचा त्यास संदर्भ आहे. राष्ट्रसंतानीच तो परिपाठ घालून दिला होता, अशी माहिती राष्ट्रसंत उपासक विजय मंथनवार हे देतात. त्या सोबतच जय गुरुदेव असं जयघोष मोदी यांनी केला तेव्हा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिसरातील गुरुदेव प्रेमी आवर्जून उपस्थित राहणार, हे हेरून असे परिसर महात्म्य पंतप्रधान मोदी यांनी पूर्वीच कळविण्यात आले होते. त्यास एक संयोजक सुमित वानखेडे यांनी दुजोरा दिला. पुढे बलिदानाची भूमी असलेली आष्टी, संत लहानूजी महाराज देवस्थान साठी केलेली मदत, येथील लोअर वर्धा प्रकल्प, संत मायबाई, आडकोजी महाराज यांचा मोदींनी आवर्जून उल्लेख केला.
आणखी वाचा-भंडारा : नवमतदारांसह ज्येष्ठांची नावे यादीतून गहाळ, अनेकजण मतदानापासून वंचित
स्थानिक बोलीभाषेतील त्यांनी सादर केलेली म्हण टाळ्या घेणारी ठरली. ते म्हणाले, ‘बारश्याला गेला अन् बारव्याला आला ‘. म्हणजे काँग्रेसच्या काळात कामे ठराविक काळात होत नव्हती. विलंब होत होता. त्यामुळे अनेक पिढ्याचे नुकसान झाले. यावर पण श्रोते खळाळून हसले. यापूर्वी दोनदा वर्ध्यात आलो. पण यावेळ सारखी गर्दी दिसली नव्हती. गर्दी वाढत आहे म्हणजे लोकांचे आपल्यावरील प्रेम वाढत असल्याचे हे चिन्ह होय, असे ते म्हणाले. सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार रामदास तडस व नवनीत राणा, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, सुमित वानखेडे प्रामुख्याने हजर होते.