लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : व्यवस्था परिवर्तनाचा विद्रोही स्वर गाण्यातून दमदारपणे सादर करणारे कवी आणि लोकगायक गदर यांच्या स्मृतीनिमित्त गुरुवारी आयोजित क्रांतिदर्शी काव्य संमेलन सुरू होण्याच्या १५ मिनिटाआधी पोलीस कार्यकमस्थळी पोहोचले व त्यांनी पूर्वपरवानगी न घेतल्याचे सांगत हा कार्यक्रम थांबवला.

आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चरल ॲन्ड लिटरेचर, नागपूर या संस्थेच्यावतीने हिंदी मोर भवनातील अर्पण सभागृहात हे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ कवी इ.मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यसंमेलनात लोकनाथ यशवंत, प्रसन्नजीत गायकवाड, का.रा. वालदेकर, उल्हास मनोहर, सुधीर भगत, प्रभू राजगडकर, चंद्रकात वानखेडे, महेंद्र गायकवाड, किरण काशिनाथ, सुरेश वर्षे, संजय गोडघाटे, पल्लवी जीवनतारे, मच्छिंद्र चोरमारे, अशोक इंगळे, भास्कर पाटील (अकोला), भूषण रामटेके (पुलगाव), बळी खैरे (यवतमाळ), शेषराव धांडे ( वाशीम), श्रीधर अंभोरे, (अहमदनगर), इसादास भडके, विद्याधर बन्सोड (चंद्रपूर), सुरेखा भगत (अमरावती) उषाकिरण आत्राम (गडचिरोली), प्रशांत ढोले (वर्धा) आदी कवी आपली कविता सादर करणार होते. परंतु, त्यापूर्वीच बर्डी पोलीस कार्यक्रमस्थळी पोहोचले व त्यांनी कार्यक्रम थांबवण्यास सांगितले. कार्यक्रमाचे संयोजक दादाकांत धनविजय आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते भूपेश थुलकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कार्यक्रमाला आलेले कवी आणि काव्य रसिकांनी नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-धक्कादायक! देशात वर्षाला सव्वा लाख जणांना अंधत्व, मागणीच्या तुलनेत निम्मेही बुब्बुळ प्रत्यारोपण नाही

दादाकांत धनविजय आणि भूपेश थुलकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, गदर यांनी दलित शोषित, पीडित माणसांचा संघर्ष लोकगीतातून जगासमोर मांडला. शोषिताविरोधात त्यांनी एल्गार पुकारला. गदर यांच्या क्रांतिकारी कार्याला अभिवादन करण्यासाठी या क्रांतिदर्शी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला.

आयोजकांनी कार्यक्रमाची लेखी परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रम थांबवला. परवानगी घेतली असती तर रितसर कार्यक्रम घेण्यास हरकत नव्हती. -नरेंद्र हिवरे, ठाणेदार, सीताबर्डी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poetry meeting on gadar stopped objection by police for not taking prior permission vmb 67 mrj
Show comments