गडचिरोली : बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणात विष टाकल्याने २८ जणांना बाधा झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलैला सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. यात पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांवर उपचार सुरु आहेत. ही घटना धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपीनगट्टा येथील आहे.राेपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातनीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम ४ जुलैला आयोजित केला हाेता.

यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास सामीश जेवणाचा बेत आखला होता. मात्र, पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या, मळमळ, डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. दुसरी पंगत थांबविण्यात आली. प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poison in food 28 people including five children affected ssp 89 amy
First published on: 05-07-2024 at 07:50 IST