एकादशीच्या दिवशी (२१ सप्टेंबर) फराळात भगर पिठाचे पदार्थ खाल्याने चिखली तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. त्यांना विषबाधा झाल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. या बाधितांना चिखली येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, बाधित रुग्णसंख्या २० च्या आसपास असून याची पुष्टी होऊ शकली नाही. बुधवारी एकादशी असल्याने आमखेड व अन्य गावातील ग्रामस्थांनी भगर पिठाचे पदार्थ खाल्ले. यानंतर त्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी, हात पाय दुखणे, डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. ग्रामस्थांना रात्री उशिरा चिखली शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
चिखली पोलिसांनी एका रुग्णालयाला भेट दिली असता तिथे आमखेड गावातील ७ रुग्ण भरती असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दरम्यान, यासंदर्भात अन्न- औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. डी. केदारे यांना विचारणा केली असता, सध्या तरी आमच्याकडे कोणतीही तक्रार किंवा वैद्यकिय अहवाल आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अहवाल आल्यावर तत्काळ कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.