अकोला : घरातील भाजीच्या टोपलीत अत्यंत विषारी घोणस साप दडून बसल्याचे शहरातील अकोट फैल परिसरात आढळून आले. सर्पमित्र बाळ काळणे यांनी शिताफीने त्या सापाला पकडून कुटुंबाला भयमुक्त केले. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सर्वत्र पाणी साचल्यामुळे घरांमध्ये साप आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना अकोट फैल भागात घडली. शेख हबीब हे त्यांच्या कुटुंबासोबत राहतात.
नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरात गेले असता, त्यांच्या कुटुंबीयांना भाजीपाल्याच्या टोपलीत काहीतरी हलताना दिसले. कुतूहलाने पाहिले असता, त्या ठिकाणी साप दडून बसल्याचे आढळून आले. घरात साप शिरल्याचे लक्षात येताच सर्व कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने सर्प मित्र बाळ काळणे यांच्याशी संपर्क साधला. काळणे लागलीच हबीब यांच्या घरी पोहोचले.
तोपर्यंत साप टोपलीतच बसलेला होता. काळणे यांनी हबीब कुटुंबीयांना धीर देत स्वयंपाक घरातील टोपलीचे निरीक्षण केले असता तो साप अत्यंत विषारी घोणस असल्याचे समोर आले. काळणे यांनी शिताफीने सापाला पकडले. या सापाला जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती काळणे यांनी दिली. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साप निघत असून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.