यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. दोन दिवसांत तब्बल २२ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरीप पिके खरडून गेली. त्यातच आज सोमवारी सर्वत्र शेतकऱ्यांचा पोळा हा सण पावसाच्या सावटात पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर टीका करून संताप व्यक्त् केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या. तर कुठे सोयाबीनचे दर घसरल्याचा संताप व्यक्त झाला. ‘सोयाबीनले भाव नाही , त भाजपाले मत नाही’, असा संताप व्यक्त करून भाजपसह सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारविरोधी, उपहासात्मक झडत्यांनी अनेक ठिकाणी पोळ्यात रंगत आणली.

हेही वाचा – वर्धा : दुचाकीसह दोघे पुरात वाहून गेले, दोन दिवसात…

पोळा रे पोळा, बैलपौळा
सारे झाले पोळ्यामंदी गोळा,
शेतकऱ्यांच्या मदतीचा भुलला हो वादा,
एक नमन गौरा, पार्वती, हरबोला हरहर महादेव अशा झडत्या रंगल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही झडत्यांमधून टीका झाली.

सलाईन रे सलाईन
सरकारचं सलाईन,
मुख्यमंत्र्यांची आता
लाडकी झाली हो बहीण!
बहिणीच्या लाडात
लंबा झाला हो दाजी
कापूस, सोयाबीनले नाई भाव
बहिणीचीच हाये हाजी हाजी!

अनेक गावांमध्ये आज पावसामुळे पोळा सणावर विरजन पडले. गावांमधील बैलजोडींची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने त्यावर पोळ्यात अनेकांनी चिंतन केले. ग्रामीण भागात पावसाने सर्वत्र कहर केल्याने शेतकऱ्यांनी घरीच बैलजोडीचे पूजन करून पोळा साजरा केला. दरम्यान यवतमाळ येथील समता मैदानात आज सोमवारी दुपारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून पोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी, शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून राबणारे बैल हे शक्तीचे आणि श्रमाचे प्रतिक आहे. त्यांच्याप्रती केवळ पोळा या सणालाच नव्हे तर आपण कायमच कृतज्ञ आहोत, असे प्रतिपादन केले.

हेही वाचा – शिक्षण विभागातील बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’, शिक्षण मंत्री म्हणाले बदल्याच बंद तर…

जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून, शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई संदर्भात शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश आजच जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पालकमंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्याहस्ते उत्कृष्ठ ठरलेल्या बैलजोडीचे मालक मोहन देवकर, सरदर चौधरी, दीपक सुलभेवार, रवींद्र पेंदोर, सोनू चौधरी आदींना गौरविण्यात आले.