रस्त्याने जाताना कोणीतरी अचानक सायलेंसरमधून फटाके उडवत बाजूने भरधाव निघून जातो. त्यामुळे सामान्य वाहनधारक विचलित होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. वाहनांच्या सायलेंसरमधून फटाके वाजवणारे बहुतांश वाहनचालक हे बुलेटस्वार असतात. अशाच बुलेट चालकांवर लक्ष केंद्रित करून वाहतूक शाखेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरधाव वेगात धावणाऱ्या दुचाकी, बुलेटचे सायलेंसर बदलून फटाका फोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध आठ दिवसांत २४ प्रकरणे दाखल करण्यात आली. तसेच विनाहेल्मेट वाहन चालवणे, विना सिटबेल्ट, विनापरवाना वाहन चालवणाऱ्या चार हजार ८५८ जणांविरुद्ध वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारून २२ लाखाचा दंड वसूल केला. जिल्ह्यात प्राणांतिक अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकी आणि बुलेटचे सायलेंसर बदलवून फटाके फोडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी वाहतूक शाखेला दिले. त्यावरून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला व उपविभागीय वाहतूक शाखेने १ ते ९ एप्रिलदरम्यान मोहीम राबवली.

हेही वाचा >>>बळीराजाचे अश्रू कोण पुसणार !; जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची नुकसान पाहणीकडे पाठ, शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पोहोचले नाही

या मोहिमेदरम्यान भरधाव धावणाऱ्या व बुलेटचे सायलेंसर बदलवून कर्कश आवाज करणाऱ्या २४ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून २४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, विना परवाना वाहन चालवणाऱ्या चार हजार ८५८ चालकांविरुद्ध कारवाई करून २२ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.अपघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, मद्य प्राशन, मोबाईलवर बोलणे आदी प्रकरणी जागृती होण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले. पालकांनी लहान मुलांच्या हाती वाहने देऊ नये, अन्यथा पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police action against bullet riders who make noise through silencer yavatmal nrp 78 amy
Show comments