यवतमाळ : जिल्ह्यातील गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. रेकॉर्डवरील हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएससह तडीपारीची कारवाई सुरू केली. यवतमाळ जिल्हा कायम गुन्हेगारी वर्तुळात चर्चेत राहिला आहे. मुंबई, नागपूरनंतर यवतमाळचा क्रमांक लागतो. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळीतील सदस्य नेहमीच रक्तपातासारख्या घटनांना आयाम देत आले आहेत. चित्रपटातील रंजक प्रसंगामुळे तरुणांसह अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण वाढत आहे.
मागील ११ महिन्यांच्या कालावधीत सहा मोक्का, २३ एमपीडीए व १९ तडीपारीच्या प्रस्तावांवर मंजुरीची मोहोर उमटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगार धास्तावले आहेत. पोलिसांच्या या कारवाईने सण-उत्सव अगदी शांततेत पार पडले. गुन्हेगारांच्या टोळ्यांना डोके वर काढता आले नाही. मोक्का, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईतून वाचायचे असेल तर आता गुन्हे करताना विचार करण्याची वेळ गुन्हेगारांवर आली आहे.
हेही वाचा – मध्य रेल्वेचा सौर ऊर्जेवर भर, ८.११ मेगावॅट क्षमता स्थापित
हेही वाचा – अमरावती : बडनेरा-नाशिक विशेष मेमू गाडीला मुदतवाढ
२०२३ या वर्षाची सुरुवातच खुनाच्या सत्राने झाली. कौटुंबिक वाद, मालमत्ता, चारित्र्याचा संशय, दारूच्या नशेत, चोरी करण्याचा उद्देश यासह संघटितरीत्या एकत्र येऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी खुनाच्या घटनांना आयाम दिला. गुन्हेगारांची समाजात निर्माण होत असलेली दहशत कमी करण्यासाठी पोलीस दलाने पोलीस ठाणेनिहाय माहिती काढणे सुरू केले. मागील तीन वर्षांत बोटावर मोजण्याइतक्याच कारवाया झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी कोणत्याही गुन्हेगाराची गय करायची नाहीच, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने कारवाईचा आलेख वाढला आहे. सहा मोक्काच्या गुन्ह्यात ५० आरोपी आहेत. एमपीडीएच्या २३ तर तडीपारीचे १९ आदेश पारीत झाले आहेत. आगामी काळातही आणखी मोक्का, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाया करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.