नागपूर- शिर्डी दरम्यान सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर अतिवेगाने धावणाऱ्या ५०० चारचाकी व जड वाहनांवर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग, नागपूरच्या विविध कार्यालयांनी कारवाई केल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. समृद्धी महामार्गावर शासनाने चारचाकी वाहनांसाठी वेगमर्यादा १२० किलोमीटर प्रतितास आणि जड वाहनांसाठी ८० किलोमीटर प्रतितास निश्चित केली आहे. त्यानंतरही बरीच वाहने नियमांचे उल्लंघन करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गाचा ११ डिसेंबर २०२२ रोजी शुभारंभ केला होता.
हेही वाचा >>> वऱ्हाड्यांची बस खड्ड्यात कोसळली, महिला जागीच ठार
तेव्हापासून १५ जानेवारी २०२३ पर्यंत येथे अतिवेगाने धावणाऱ्या सर्वाधिक म्हणजे २२१ वाहनांवर वाशीम महामार्ग प्रादेशिक केंद्र हद्दीत कारवाई करण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या खुर्सापार केंद्र हद्दीत ११८ वाहन, मलकापूर (बुलढाणा) केंद्र हद्दीत ३६ वाहन, वर्धा केंद्र हद्दीत ४२ वाहन तर अमरावती हद्दीतही बऱ्याच वाहनांवर कारवाई केल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. या महामार्गावर पहिल्या ३५ दिवसांत ७ गंभीर अपघात होऊन १६ प्रवासी जखमी झाले. ४९ किरकोळ अपघातात २६ नागरिक जखमी झाले. ५ प्राणांकित अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू तर ३ प्रवासी जखमी झाल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.