यवतमाळ : अल्पावधीत श्रीमंत होण्यासाठी यवतमाळ, अमरावतीमधील तरुण गुप्तधन शोधण्याच्या कामी लागले आहे. शुक्रवारी त्यांनी महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र, गावकऱ्यांच्या भीतीने पळ काढला होता. या प्रकरणी १० जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी मध्यरात्री सवना परिसरात करण्यात आली आहे.
उत्कर्ष आनंता माळधुळे (२४) रा. साईनगर अमरावती, गौरव प्रभुदास मेश्राम (२४) रा. लोहारा, यवतमाळ, प्रथम नीरज सिंघानिया (२५) रा. मेन लाईन, यवतमाळ, गौरव अतुल पांडे (२६) रा. टिळकवाडी, यवतमाळ, माधव कोंडू नेवारे (३६) रा. अकोला बाजार, यवतमाळ, योगेश विनोद कपीले (२५) रा. रहाटगाव, अमरावती, प्रकाश भास्कर सहारे (४०) रा. लोहारा, यवतमाळ, निलेश रामभावजी भोरे (३४)रा. टाकळी जहागीर जि. अमरावती, श्रीकांत वासुदेव सोनवणे (२३) रा. अकोला बाजार, यवतमाळ आणि स्वप्निल चक्करवार रा. मोरथ ता. महागाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील मोरथ येथे काही युवक स्वप्नील चक्करवार याच्या घरी जादूटोण्याचे साहित्य घेऊन व पूजा विधी करून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शेकडो गावकरी त्या ठिकाणी जमा झाले असता, या टोळीतील नऊ जणांनी स्वप्निल चक्करवार याच्या घरून दोन चारचाकी वाहनाने वाकोडीमार्गे सवनाकडे पळ काढला. याबाबतची गोपनीय माहिती महागाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मिलींद सरकटे यांना मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह सवना बसस्थानक गाठून सापळा रचला.
दरम्यान, वाकोडी गावाकडून येणाऱ्या दोन चारचाकी वाहन पोलिसांनी थांबवून त्यामधील नऊ तरूणांची चौकशी करीत त्यांना पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान दोन्ही वाहनांची तपासणी केली असता, रुद्राक्षाच्या माळा, लिंबू, कांदा, तीन स्टीलच्या डब्यात हळद-कुंकू व कापूर मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी वाहन (क्र.एमएच-२७-बीव्ही-०९२४) आणि (एमएच-४९-बी- ५६८८ ) ही दोन चारचाकी वाहने जप्त केली. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी वसीम सुलेमान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून १० तरुणांवर जणांवर महाराष्ट्र नरबळी व इतर माणूस अपिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचे अधिनियम २०१३ नुसार विविध कलमान्वये गुन्हे नोंद करून अटक केली.
महागाव पोलिसांनी १० जणांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे करीत आहेत.