अमरावती: शहराच्‍या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या पाच अल्‍पवयीन मुलांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. त्‍यांच्‍याकडून तब्‍बल ११ दुचाकी जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत. दुचाकी चोरी करायची. त्‍यामध्‍ये पेट्रोल आहे, तोपर्यंत फिरवायची आणि नंतर कोणत्‍याही ठिकाणी उभी करून ठेवायची, हा त्‍यांचा नित्‍यक्रम गेल्‍या चार महिन्‍यांपासून सुरू होता. या अल्‍पवयीन चोरट्यांनी मौजमजा करण्‍यासाठी दुचाकी चोरीचे गुन्‍हे गेल्‍याचे तपासात निष्‍पन्‍न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरजगाव बंड येथील रहिवासी शेख जहीर शेख ईनायत (३२) यांनी आपली दुचाकी क्रमांक एमएच २७ सीडी २१५२ ही पंचवटी चौकातील उड्डाणपुलाखाली उभी केली. त्यानंतर ते मित्रासोबत दुचाकीचे सुटे भाग घेण्याकरिता शहरात गेले. या काळात त्यांची दुचाकी लंपास करण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यावर शेख जहीर यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा… यवतमाळ: जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर नियुक्त केले सदस्य!

तपासादरम्‍यान या गुन्ह्यात शेगाव येथील पाच अल्‍पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सोबतच आणखी काही दुचाकी चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत, निळकंठ गवई, संजय इंगळे, दुलाराम देवकर, सचिन बोरकर, जयसेन वानखडे, बंडू खडसे, मतीन शेख, दिनेश टवले यांनी केली. ही पाचही मुले १५ ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. केवळ मौजमजा करण्‍यासाठी ते दुचाकी वापरत होते, असे तपासात समोर आल्‍याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले.