गडचिरोली : स्पर्धा परीक्षेसह पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या साईनाथ नरोटे या विद्यार्थ्याची पोलीस खबरी असल्याचा संशयावरुन नक्षलवाद्यांनी ९ मार्च रोजी मर्दहूर गावी गोळी झाडून हत्या केली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला आरोपी आडवे मुरे गावडे हा निर्दोष असून त्याची सुटका करण्यात यावी, अशी मागणी मर्दहूर ग्रामसभेने पत्रपरिषदेतून केली आहे. गावकऱ्यांनी याविषयीचे निवेदन देखील भामरागड तहसीलदारांना दिले.
हेही वाचा >>> बालाघाट जिल्ह्यातील जंगलात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन पायलट ठार
होळीनिमित्त गावी आलेल्या साईनाथ नरोटे या विद्यार्थ्याची ९ मार्च रोजी नक्षल्यांनी हत्या केली होती. साईनाथ शेतात असताना दुपारच्या सुमारास घरच्यांसमोर नक्षल्यांनी त्याला उचलून नेले होते. सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने भाऊ संतोष नरोटे याने नारागुंडा पोलीस मदत केंद्रात सूचना दिली होती. दरम्यान गावाजवळ त्याचे शव आढळून आले होते. साईनाथच्या मृत्यूनंतर आरोपी आडवे गावडे हा शवविच्छेदनापासून ते दफनविधीपर्यंत पूर्णवेळ नरोटे कुटुंबीयांसोबत होता. त्याला व मधुकर नरोटीला १४ मार्च रोजी सी ६० च्या जवानांनी चौकशीच्या नावाखाली घरातून पकडून नेले. यावेळी गावकऱ्यांनी विचारपूस केली असता पोलिसांनी त्यांना दमदाटी केल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपी म्हणून पकडलेले दोघेही निर्दोष असून त्यांची सुटका करण्यात यावी व खऱ्या दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी मर्दहुर ग्रामसभेने केली आहे. शनिवारी भामरागड येथे गावकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सर्व घटनाक्रम मांडला. यावेळी मृत साईनाथ याचे वडील व भाऊ दोघेही उपस्थित होते.
गावडेने हत्येची कबुली दिली
साईनाथच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आडवे गावडे हा नक्षलवादी चळवळीत कार्यरत होता. त्याला शिक्षासुध्दा झाली होती. चौकशी दरम्यान त्याने तीन नक्षलवाद्यांच्या सोबतीने साईनाथची हत्या केल्याचे देखील कबूल केले आहे. मधुकर नरोटेला दुसऱ्या गुन्हयात ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा या हत्येशी संबंध नाही. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली.