ग्रामीण भागातून अचानकपणे मेंढ्या, पाळीव जनावरे बेपत्‍ता होण्‍याचे प्रकार वाढले होते. या मेंढ्या चोरून नेल्‍या जात होत्‍या, हे लक्षात येत होते, पण चोरांचा सुगावा लागत नव्‍हता. गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने तपास सुरू केला, तेव्‍हा त्‍यांना चोरीची कार्यपद्धती पाहून धक्‍काच बसला. या जनावरांची तस्‍करी चक्‍क कारमधून केली जात असल्‍याचे निदर्शनास आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून कारमधून मेंढ्या चोरणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व अंजनगाव सुर्जी पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यप्रदेशमधून अटक केली. चोरट्यांकडून कार व दुचाकी असा एकूण ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘ऑरेंज सिटी’ ते ‘क्राईम सिटी’! उपराजधानीत गेल्या दहा वर्षांत तब्बल ८९४ हत्याकांड

राजू हजारी बंजारा (४०) रा. कलमकाकुआ, राजस्थान, महेंदर मंत्रा बंजारा (२६), महेंद्रा चुन्नीलाल बंजारा (२३), श्यामराज परती बंजारा (२६) व राजकुमार बलराम बंजारा (२८) सर्व रा. बोरकाकुआ, राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मेंढ्यांसह जनावरे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता त्याला आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास करीत होते.

हेही वाचा >>> नागपूर : उपराजधानीत आकर्षक चित्रांनी सुशोभित भिंती पुन्हा काळवंडण्याच्या मार्गावर

तपासात अशा प्रकारचे गुन्हे राजस्थानमधील चोरटे हे टोळीने करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर तपासाची चक्रे फिरविण्यात आली. त्यात चोरटे हे राज्यस्थानमधील कोटा व झालवार जिल्ह्यातील असल्याचे समोर आल्यावर पोलीस पथक राजस्थानला रवाना झाले. त्यावेळी संशयित आरोपी कार क्रमांक आरजे १७ यूए २००१ ने राजस्थानवरून मध्यप्रदेशला येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पथकाने मध्यप्रदेशातील राजगड येथील पोलिसांच्या मदतीने महामार्गावर नाकाबंदी करून चोरट्यांना अटक केली. आरोपींनी जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीसह शिरजगाव कसबा, चांदूरबाजार, मोर्शी येथून मेंढ्या चोरी केल्याचे कबुल केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested inter state gang which stole sheep from cars in rural areas of nagpur district mma 73 zws