अमरावती : घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारित करून चमकोगिरी करणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली.संशयिताकडून धारदार कोयता आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.संशयित घातक शस्त्र बाळगून समाजमाध्यमात चित्रफिती प्रसारीत करीत होता. त्यांच्या चमकोगिरीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने ताजनगर भागातून संशयिताला ताब्यात घेतले.

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे प्रमाण वाढत आहे.मोहम्मद झिशान मोहम्मद मतीन (२१, रा. ताज नगर) असे अटकेतील तरूणाचे नाव आहे. हाती कोयता घेऊन रिल्स बनविणे या आरोपीला चांगलेच महागात पडले.या प्रकरणी गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक रशीद सौदागर यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मोहम्मद झिशानसह मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ (२३, रा. अलीम नगर) याच्या विरोधात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. झिशानने रिल्स बनविण्यासाठी वापरलेला कोयता हा युनूसच्या घरात आढळून आला, त्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आले.

या प्रकरणी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात विना परवाना बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शस्त्र कायदा काय? शस्त्र कायद्यातील नियम २०१६ च्या नियम ८ अन्वये, बंदुक किंवा इतर कोणत्याही शस्त्रास्त्रांचा परवाना असलेल्या व्यक्तीला (ज्यामध्ये तलवारी आणि धारदार ब्लेडचा समावेश आहे) सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास परवानगी नाही.

लग्न, सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा, मिरवणूक किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी शस्त्र सोबत बाळगण्यास किंवा त्याचे प्रदर्शन करण्याची परवानगी नाही.बंदुक किंवा इतर शस्त्रे बाळगण्यासाठी किंवा ती सोबत नेण्यासाठी परवान्याचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीला एक अर्ज भरावा लागतो. ज्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही शस्त्रे एखाद्या जत्रेत, धार्मिक मिरवणुकीत, इतर सार्वजनिक कार्यक्रम, कोणत्याही शैक्षणिक संस्थांच्या परिसरात नेऊ नयेत अशी अट असते. ही अट खेळ, संरक्षण किंवा प्रदर्शनासाठी शस्त्रे किंवा दारुगोळा घेणे, ताब्यात घेणे आणि प्रवासात नेण्याच्या अशा सर्व परवान्यामध्ये नमूद केलेली असते.

भारतीय कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रे बाळगण्यावर बंदी आहे. जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतरच बंदूक सोबत ठेवण्यासाठी परवानगी आहे. स्वयंपाकघरासाठी वापरण्यात येत नसलेल्या नऊ इंचांपेक्षा जास्त लांबीच्या चाकू आणि ब्लेड यांनाही शस्त्रास्त्र कायद्यानुसार परवाना आवश्यक आहे. परवाना नसताना शस्त्र बाळगल्यास तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा आहे.