नागपूर: बहिणीसोबत कॉम्प्युटर क्लासला जात असलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीशी एका युवकाने अश्लील चाळे केले. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या आरोपीला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली. राहुल आशिक पंचेश्वर (२०, रा. गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अल्पवयीन मुलीच्याच वस्तीत राहतो. अल्पवयीन मुलीचा आरोपी राहुल नेहमीच पाठलाग करीत होता. सोमवारी दुपारी २ वाजता आणि सायंकाळी सहा वाजता अल्पवयीन मुलगी कॉम्प्युटर क्लासला जात असताना आरोपी राहुलने तिचा पाठलाग करून तिच्या अंगावरील दुपट्टा ओढून तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.
हेही वाचा… नागपूर: मैत्रिणीच्या घरातच युवकाचा खून करण्याचा प्रयत्न
\अल्पवयीन मुलीने मनाई केली असता आरोपीने शिविगाळ करून तिला पाहून घेण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन तिच्या नातेवाईकांना चाकू दाखवून धमकी दिली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राहुल विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.