नागपूर: शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यांसह इतर ठिकाणचे चंदन चोरी करणाऱ्या आरोपीस सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. तो मध्यरात्रीला बंगल्यात घुसून झाड तोडत होता आणि साथीदारांच्या मदतीने घेऊन जात होता. साबीरखान अजीजखान पठाण (३४) रा. कठोराबाजार, जालना असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार मोहम्मद फकीरखान अयूबखान पठाण फरार आहे. पोलिसांनी यशोधन जयंत बुटी (५१) रा. बुटी बंगला, रवींद्रनाथ टॅगोर मार्ग, सिव्हील लाईन्सच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
गत २ डिसेंबरच्या रात्री आरोपीने बुटी यांच्या बंगल्यातील ३५वर्षे जुने चंदनाचे झाड तोडले. दुसऱ्या दिवशी सकाळी बुटी कुटुंबाला झाड तुटल्याचे आणि चंदनाचे खोड गायब असल्याचे समजले. त्यांनी घटनेची पोलिसात तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आली. साबीर आणि अयूब सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, मात्र त्यांचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडण्याची योजना बनवली. आसपासच्या परिसरांमध्ये गस्त वाढवून संशयितांची चौकशी सुरू केली.
हेही वाचा… प्रेम एकीशी अन् लग्न दुसरीशी; विवाहित प्रियकराविरुद्ध…
सोमवारी दोन्ही आरोपी म्यूर मेमोरियल रुग्णालय परिसरात चोरी करण्यासाठी आले. पोलिसांनी सापळा रचून साबीरला पकडले, मात्र अयूब फरार होण्यात यशस्वी झाला. साबीर चंदनाची झाडे तोडून लाकूड चोरी करण्यात तरबेज आहे. त्याच्या विरुद्ध सदर ठाण्यात ५, सीताबर्डीत ४ आणि अंबाझरी ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी आरोपीकडून कटर मशीन, इतर औजारे आणि दुचाकी वाहनासह ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपींनी चंदनाची विक्री कोणाला केली याचा तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि संतोष कदम, पोहवा चंद्रशेखर गौतम, पोशि शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि विक्रमसिंग ठाकूर यांनी केली.