नागपूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घरासमोर बॉम्ब ठेवला असून तेथे बॉम्बस्फोट होणार आहे, असा निनावी फोन नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, असा फोन आल्याबाबत पोलीस सहआयुक्तांनी नकार दिला. त्यामुळे कुणीतरी अफवा पसरवली असल्याची चर्चा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या शहर नियंत्रण कक्षाला आला. त्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. नागपूर पोलिसांनी मुंबई आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचताच नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांचे फोन खणखणायला लागले.
हेही वाचा : “तुम्ही इतके आत्मघाती…” अमिताभ बच्चनसह टायगर श्रॉफचं नाव घेत कंगना रणौतचं संतापजनक ट्वीट
पोलीस सहआयुक्त अश्वती दोरजे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, ‘नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोट करण्याबाबत कोणताही फोन आला नाही.’ त्यामुळे ही अफवा असल्याची चर्चा होती. मात्र, नागपुरातील प्रसारमाध्यमांमध्ये तासभर खल सुरू होता. अनेकांनी मुंबईतून विचारणा केली. शेवटी ती अफवा असल्याचे लक्षात आले.