लकडगंजमधील स्मॉल फॅक्टरी परीसरातील एका कारखान्यावर खाद्य तेलात भेसळ केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखा आणि लकडगंज पोलिसांनी नाट्यपूर्ण छापा घातला. मात्र, मालकाने कारवाई होण्यापूर्वीच पोलीस कर्मचाऱ्यांचे हात ओले केले. त्यामुळे कारखान्यात काहीही सापडले नसल्याच्या अविर्भावात पोलीस परतले. मात्र, या नाट्यपूर्ण छाप्याची पोलीस दलात चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मॉल फॅक्टरी परीसरातील अर्जून नावाच्या भंगार विक्रेत्याच्या दुकानाजवळ खाद्य तेलाचा कारखाना आहे.
हेही वाचा >>> धक्कादायक! ‘दोन्ही मुले माझी नाहीत’,असे म्हणत चिमुकल्याला द्यायचा सिगारेटचे चटके
कारखान्यात भेसळयुक्त तेल तयार करण्यात येत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या युनीटमधील वादग्रस्त हवालदाराला खबऱ्याने दिली. त्याने लकडगंजमधील डीबी पथकातील निवडक कर्मचाऱ्यांना हाताशी धरले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता छापा घातला. छाप्यात पोलिसांनी भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली. लगेच कारखान्याचा मालक महागड्या कारने तेथे पोहचला. त्यांनी लगेच गुन्हे शाखेच्या युनीटचेे आणि डीबी पथकातील निवडक कर्मचाऱ्यांना अर्थपूर्ण व्यवहार केला. त्यामुळे दोन्ही पथके कुठेही वाच्यता न होऊ देता परत फिरले. या नाट्यपूर्ण छाप्याची पोलीस दलात मोठी चर्चा आहे. यापूर्वी, याच पथकाने धान्य व्यापारी सोनू-मोनू यांच्यावरही नाट्यपूर्ण कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.