जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कठडे ओलांडून जाण्याच्या प्रयत्न करणारे काँग्रेस कार्यकर्ते आणि त्यांना थांबवणारे पोलीस यांच्यात धक्काबुकी झाली. यामध्ये युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्यासह दोन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्ती वसुली संचालनालय (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्रास देत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कठडे लावले होते. ते ओलांडून आत जाण्याचा प्रयत्न शेळके आणि काही कार्यकर्ते करीत होते. यावेळी झालेल्या धक्काबुकी आणि रेटारेटीत शेळके जमिनीवर पडले. त्यांना दुखापत झाली.त्यांना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले.