उमरेडचा पोलीस शिपाई गंभीर जखमी

नागपूर : वाळू तस्करी करताना ट्रकचालक व वाहकाने उमरेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उमरेडच्या वेकोलि परिसरात घडली.

योगीराज वंजारी असे जखमी शिपायाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ट्रकमधून (क्र. एमएच—३१, सीक्यू—११२१०) वाळू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती उमरेड पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे, प्रदीप ठाकरे, योगीराज वंजारी आणि उमेश बांते हे ट्रकच्या शोधात टेहळणी करीत होते. त्यावेळी उमरेड वेकोलिच्या परिसरातून ट्रक जाताना दिसला. पोलिसांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला. ट्रक थांबला. त्यावेळी ट्रकमध्ये एक वाहक सोबत होता. ट्रकची पाहणी केली असता त्यात वाळू भरलेली होती. पोलिसांनी ट्रक चालकाला रॉयल्टीची पावती दाखवण्यास सांगितली. त्याच्याकडे ती नव्हती. त्यामुळे वंजारी ट्रकमध्ये चढले व इतर दस्तावेज तपासून ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले. चालकाने अचानक ट्रक सुरू केला व पोलीस शिपाई वंजारी यांना धावत्या ट्रकमधून ढकलून खुनाचा प्रयत्न केला. यात वंजारी यांच्या डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. काही अंतरावर आरोपी ट्रक सोडून पळून गेले. पोलिसांनी वंजारींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले.

प्रथमोपचारानंतर त्यांना नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले.

याप्रकरणी उमरेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांनी रुग्णालयात जाऊन शिपायाच्या प्रकृतीची चौकशी केली.

दोन महिन्यांतील दुसरा हल्ला

एकेकाळी पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू होता. आता तेच तस्कर निर्ढावले असून महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात उमरेड अंतर्गत घडलेली ही दुसरी घटना आहे. दीड महिन्यांपूर्वी वाळू तस्करांनी नायब तहसीलदाराला १५ किमी फरफटत नेले व खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर आता पोलीस शिपायावर हल्ला करण्यात आला. तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पवनीतून वाळू तस्करी

पवनी येथील वैनगंगेच्या घाटावरून  नागपुरात मोठय़ा प्रमाणात वाळूची तस्करी होते. या घटनेतील ट्रक हा रहीस अन्सारी याच्या मालकीचा असून पोलिसांनी त्यालाही सहआरोपी केले आहे. पोलिसांनी त्याला दुपारी ताब्यात घेतले असून सायंकाळपर्यंत अटक करण्यात येईल. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे करीत आहेत.

Story img Loader