नागपूर : राज्यात सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस विभागाला अपयश आले असून गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेगारांनी तब्बल ७ हजार ६३४ कोटी रुपयांनी फसवणूक केली आहे. आतापर्यंत सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील केवळ ११ टक्केच सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून अद्यापही ८९ टक्के सायबर गुन्हेगार मोकाटच आहेत, ही माहिती शासकीय संकेतस्थळावरुन समोर आली.

सध्या इंटरनेटच्या वापरात प्रचंड वाढ झाली असून सायबर संबधित गुन्ह्यांच्या प्रमाणातही वाढ होत आहे. राज्यात सायबरच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष भरती होत नसून उपलब्ध असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमधूनच सायबरच्या गुन्ह्यांचा तपास केला जातो. त्यामुळे अप्रशिक्षित तपास अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा दोन पावले पुढे असलेले सायबर गुन्हेगार पोलिसांच्या हाती सापडत नाहीत. त्यामुळेच राज्यात ‘डिजीटल अरेस्ट, ओटीपी-पासवर्ड विचारुन फसवणूक, सेक्स्टॉर्शन, शेअर ट्रेडिंग आणि लिंक’ पाठवून सायबर गुन्हेगार राज्यात लूट करीत आहेत. राज्यात २०२४ मध्ये सायबर गुन्हेगारांनी ७ हजार ६३४ लाख कोटी रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांनी सर्वाधिक लूट पुणेकरांची केली आहे. पुण्यात सहा हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तर मुंबईत ८८८ कोटी २९ लाखांनी फसवणूक झाली. ठाणे शहरात १७४ कोटी ४ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. गृहमंत्र्याच्या नागपूर शहरात ६३ कोटी ८५ लाखांनी फसवणूक करण्यात आली. अजुनही राज्यात सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीची मालिका सुरुच असून पोलिसांना सायबर गुन्हेगारांना रोखणे कठिण झाले आहे.

सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबई-पुण्यात

सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केल्याच्या सर्वाधिक घटना मुंबई आणि पुण्यात घडल्या आहेत. मुंबईत ४ हजार ८४९ सायबर गुन्हे दाखल असून ७५७ सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या पुण्यात १५०४ गुन्हे दाखल असून फक्त ९ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ६८० गुन्हे दाखल केले असून १३ आरोपींना अटक केली. शेवटच्या स्थानावर असलेल्या नागपुरात २१२ गुन्ह्यांची नोंद असून केवळ ५ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

प्रत्येक सायबर गुन्ह्यांची नोंद करुन गांभीर्याने तपास केला जातो. आतापर्यंत लाखो रुपये सायबर गुन्हेगारांच्या घशातून परत आणण्यात आले आहेत. फसगत झालेल्या अनेक पीडितांच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम परत करण्यात आली आहे. लोहित मतानी, पोलीस उपायुक्त (सायबर गुन्हे शाखा)