नागपूर : अमरावती रोडवर रात्रीच्या सुमारास पाच कारने जाणाऱ्या युवकांनि स्टंटबाजी केली. या स्टंटबाजीचा व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्या स्टंटबाज युवकांचा शोध घेऊन त्यांची वाहने जप्त केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन चांगलाच धडा शिकवला. नागपूर पोलिसांनी आपल्या नागपूर पोलीस इंस्टाग्राम अकाऊंटवर या युवकांचा माफी मागतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या या कारवाईमुळे स्टंटबाजी करणाऱ्या युवा वर्गात एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कामगिरीचे इंस्टाग्रामवर कौतूक होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहा ते बारा युवक पाच कारने फिरायला जात होते. अमरावती रोडने जात असताना त्या कारमधील काही युवक कारच्या छतावर चढले होते तर काही युवक खिडकीतून बाहेर निघून हुल्लडबाजी करीत होते. कारचालकांनीही सीटबेल्ट लावलेला नव्हता.

हा सर्व प्रकार काही युवक मोबाईलमध्ये कैद करीत होते. या हुल्लडबाजीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकण्यात आले. काही तासांतच हे व्हिडिओ शहरातील अनेक व्हॉट्सअप ग्रूपमध्ये व्हायरल झाले. हे व्हिडिओ वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यापर्यंत पोहचले. त्यांनी या व्हिडिओतील स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्याचे आणि कार जप्त करण्याच आदेश दिले.

त्यानुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या कारच्या नंबरप्लेटवरुन कारच्या मालकाचे नाव आणि पत्ता शोधून काढला. पत्त्यावर पोहचून कार जप्त केली. तसेच कारमधील युवकांचाही शोध घेतला. त्या सर्व युवकांना वाहतूक उपायुक्त कार्यालयात आणण्यात आले. कारवर दंडात्मक कारवाई करण्यात तसेच स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून भविष्यात अशा प्रकारची धोकादायक स्टंटबाजी न करण्याबाबत लिहून घेण्यात आले. त्यांना सूचनापत्र देण्यात आले.

स्टंटबाजांच्या पालकांनाही तंबी

कार चालविणाऱ्या युवकांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. मुलांनी केलेल्या स्टंटबाजीचे व्हिडिओचे दाखविण्यात आले. यानंतर मुलांच्या हाती कार न देण्यासाठी पालकांना सूचना देण्यात आली. मुलांनी अशी पुन्हा स्टंटबाजी करु नये म्हणून पोलिसांनी पालकांनाही तंबी दिली. अन्यथा यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा दमही दिला.

स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारची स्टंटबाजी करु नये म्हणून त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. – अनिरुद्ध पुरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सीताबर्डी वाहतूक पोलीस