नागपूर : मी माफी मागणार नाही. कारण मी गांधी आहे. सावरकर नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी अनेकदा भाजपला डिवचले. यामुळे सावरकर विषयावरून राहुल गांधी विरुद्ध भाजप असा वाद पेटला होता. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातही सावरकर विषयावरून असाच काहीसा वाद पेटला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात वि. दा. सावरकर यांचा पुतळा जाळला होता. या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आणि उजव्या विचाराच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आंदोलन केले. यानंतर अंबाझरी पोलिसांनी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यावर लगेच युवक काँग्रेसने सावरकर विषयावर विद्यापीठात आंदोलन केले व सावरकरांच्या स्वातंत्रलढ्यातील सहभाग व डी.लिट. पदवीचे प्रमाण द्यावे, अशा मागणी लावून धरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू झाली. यावेळी भाजपचे शहर पदाधिकारी आणि अधिसभा सदस्य विष्णू चांगदे आणि भाजयुमोच्या नेत्या शिवानी दाणी यांच्यासह पन्नासावर कार्यकर्ते सभागृहात शिरले. घोषणाबाजी करीत कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बैठक काही वेळेसाठी स्थगित केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंच्या समोर ठिय्या मांडून राऊत यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तक्रार दाखल केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे तीन तास बैठक खोळंबली. बैठक उधळण्यासाठी सर्वच सदस्यांची या आंदोलनाला मूकसंमती दिल्याचे दिसून आले.

हेही वाचा…“उत्तर नागपुरातील उड्डाण पूल बांधकामाचे चुकीचे नियोजन,” नॉर्थ नागपूर सिनियर सिटीझन फोरमचा आक्षेप

यामध्ये राज्यपाल प्रतिनिधी समय बनसोड, वामन तुर्के, अजय चव्हाण, योगेश भुते, अधिष्ठाता यांनीही आंदोलकांचे समर्थन करण्याची भूमिका घेतली. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे बैठक उधळण्यात आली. काही वेळाने कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे स्वतः तक्रार घेऊन अंबाझरी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे अजित सिंह व पदाधिकाऱ्यांनी सावरकरांच्या स्वातंत्रलढ्यातील सहभाग व डी.लिट. पदवीचे प्रमाण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन केले. तसेच सावरकरांच्या विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

राऊत यांच्यावर अखेर गुन्हा

याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी शासकीय संपत्तीचे नुकसान करणे, विना परवानगी आंदोलन करणे, जाळपोळ करणे आणि अनधिकृतरित्या जमाव गोळा करणे, असे आरोप ठेवत विविध कलमांन्वये कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वरील सर्वच कलम अदाखलपात्र असल्याने अटक करण्याची गरज नाही, अशी माहिती अंबाझरीचे ठाणेदार विनायक गोल्हे यांनी दिली.

हेही वाचा…नागपूर : फडणवीस यांची ग्रामस्थांशी ‘चाय पे चर्चा‘, म्हणाले…

नागपूर विद्यापीठात सावरकरांच्या विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अंबाझरी पोलिसात तक्रार दिली आहे. सावरकरांचा स्वातंत्रलढ्यात सहभाग काय?, विद्यापीठाने कुठल्या आधारावर त्यांना डी.लिट. दिली याचा पुरावा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू. – कुणाल राऊत, अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police files complaint against kunal raut over veer savarkar effigy burnt case at nagpur university dag 87 psg
Show comments