अमरावती: परतवाडा नजीक पोलिसांना २७ गावठी बॉम्ब सापडल्याने अचलपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी बॉम्ब सापडण्याची ही तालुक्यातील पहिलीच वेळ आहे.
परतवाडा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी सकाळी ही कारवाई केली. दोन दुचाकीस्वार अंजनगाव मार्गाने लाल पुलाच्या दिशेने रानडुकराची शिकार करून जात असल्याची आणि त्यांच्याजवळ गावठी बॉम्ब असल्याची गोपनीय माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली होतीच. पोलिसांनी सापळा रचून अंजनगाव थांब्यानजीक आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीवर मृत रानडुक्कर आणि दुचाकीच्या हँडलला लटकलेल्या पिशवीत २७ गावठी बॉम्ब होते. यापुर्वी त्यांनी काही बॉम्ब शेतात पेरले होते, अशी माहिती मिळाली आहे.
हेही वाचा… परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ ऐवजी ५० ओबीसी उमेदवार; अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव अडकला?
पोलिसांनी या प्रकरणी चांदचौदसिंग कनी सिंग बावरी (५०), अशोक सावळाराम शिंदे (४५, दोघेही रा. लालपूल, परतवाडा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान आणि वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रानडुकरांच्या शिकारीसाठी या गावठी बॉम्बचा वापर करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.