नागपूर : छत्रपती संभाजीनगर जवळील औरंगजेबची ३५० वर्षे जुनी कबर काढून टाकण्यात यावी. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे नागपुरातील महाल, गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा आणि चादर जाळण्यात आली. त्यानंतर मध्य नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले.

पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी सोमवारी रात्रीपासून जाहीर केली. त्यामुळे महाल, चिटणीसपुरा चौक, भालदारपुरा, बडकस चौक, इतवारी सराफा बाजार, इतवारीतील किरणाओळी, गांधीबाग, गोळीबार चौक, मोमीनपुरा, टिमकी, हंसापुरी, जुना भंडारा रोड, तीन नळ चौक, गितांजली चौक, इतवारी दहीबाजार, शांतीनगर, सतरंजीपुरा, शांतीनगर, कसाबपुरा, डोबीनगर, इतवारी बाजार या मध्य नागपुरातील जुन्या बाजारपेठा आणि लोकवस्तीमध्ये संचारबंदी आहे. या भागातील औषधाची दुकाने आणि रुग्णालय वगळता सर्व दुकाने बंद आहेत. या भागात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश नाही. जमावबंदी आदेश लागू असल्याने महाल, गांधी गेट, शिवाजी पुतळा, जुना फवारा चौक, चिटणीसपुरा चौक या भागात कटेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या भागात कोणालाही प्रवेश नाही. परंतु स्थानिक नागरिकांना पायदळ फिरण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. केवळ एकत्रित येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सेंट्रल ॲव्हेन्यूवरील वाहतूक सुरू आहे. मेट्रो देखील सुरू आहे.

शहरात भालदरापुरा, हंसापुरी, मोमीनपुरा, बडकस चौक, चिटणीसपुरा चौक, गांधी गेट, महाल येथे तणावपूर्ण शांतता आहे. शहरातील कोतवाली तहसील, लकडगंज, नंदनवन, सदर, महाल यासह अन्य परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे. महाल , इतवारी लकडगंज, कोतवाली या परिसरातील बाजारपेठाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सशस्त्र जवानाना तैनात केले आहे. शहरातील मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील या काही निवडक लोकवस्त्या वगळता नागपूर शहरात इतरत्र सामान्य जीवन आहे. बाजारापेठा सुरू आहेत. शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय सुरू आहेत.

स्थानिकांचा आरोप

दंगलग्रस्त भागात नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे हंसापुरी या परिसरात अनेक सामान्य नागरिकांच्या वाहनांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. गितांजली चौकातील एका मुस्लीम व्यक्तीच्या गॅरेजमधील वाहने जाळण्यात आली. त्यानंतर हंसापुरीमधील हिंदू समाजाची वाहने जाळण्यात आली. या सर्व घटनेला नागपूर पोलीस जबाबदार आहेत, असा आरोप स्थानिकांचा आहे.

Story img Loader