नागपूर : काही तरुण-तरुणी बाईकवर लक्ष्मीभवन चौक आणि धरमपेठ चौकात पोहचल्या. काही वेळातच शेकडोंच्या संख्येने तरुण-तरुणी चौकात गोळा झाले. त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडण्यास सुरुवात केली. काहींनी कारच्या टफवर चढून नाचने सुरु केले तर काही चौकातच फेर धरुन नाचायला लागले. काहींनी फटाके पेटवले आणि हवेत फेकले. काही तरुणींच्या अंगावर पेटते फटाके पडले. मात्र, तरुणाईचा गोंधळ सुरुच होता. हे सर्व चित्र बघून उपस्थिती पोलिसांनी तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लाठ्या उचलताच एकच पळापळ झाली. काहींना पोलिसांचे दंडूके चांगलेच पडले तर काही जण पळून गेले. काही तरुणांना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि गुन्हे दाखल केले. काही मिनिटांतच चौक शांत झाला. मात्र, पोलिसांच्या लाठीचार्जची सर्वत्र चर्चा सुरु झाली.

रविवारी चँम्पीयन ट्रॉफीमधील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझिलँड संघादरम्याने खेळल्या गेला. शेवटच्या षटकापर्यंत पोहचलेल्या या सामन्यात क्रिकेटप्रेमींची उत्सूकता शिगेला पोहचली होती. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे कोण जिंकणार याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात शंका होती. क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय फलंदाजांनी बाजी मारुन सामना खेचून विजयश्री मिळवली. भारतीय क्रिकेट संघाने चँम्पीयन ट्रॉफी जिंकताच क्रिकेटवेडे तरुण-तरुणी नेहमीप्रमाणे लक्ष्मीभवन चौक आणि धरमपेठमध्ये पोहचले. रात्री बारा वाजेपर्यंत क्रिकेट प्रेमींनी अक्षरश: धिंगाणा घातला. कुणी फटाके उडवायला लागले तर कुणी फुगे फोडून आनंद व्यक्त करीत होता. पाहता-पाहता चौकात जवळपास एक हजारापेक्षा जास्त तरुणाई गोळा झाली. त्यांनी आनंदोत्सव सुरु केला. मात्र, काही वेळातच तरुणाईने मर्यादा ओलांडून फटाक्यांती आतिषबाजी करीत गोंधळ घातला.

पोलिसांचा सौम्य लाठीमार

काही असामाजिक तत्वांनी फटाके पेटवून तरुणींच्या दिशेने फेकले. त्यामुळे धावपळ झाल्याने तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस पथकासह तेथे पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. रात्री १ वाजता काही क्रिकेटप्रेमींना मात्र पोलिसांचे दंडुके खावे लागले. काही तरुणांना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

क्रिकेटप्रेमींनी उत्साहाच्या भरात फटाके उडवले. काहींनी पेटते फटाके तरुणींच्या दिशेने फेकले. त्यामुळे एकच धावपळ झाली आणि गोंधळ उडाला. त्यामुळे परिस्थितीवर नियंंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. काही तरुणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली आहे. विवेक राऊत, ठाणेदार, अंबाझरी पोलीस स्टेशन.

Story img Loader