गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी एका शिपायावर निलंबनाची कारवाई केली आहे. शुक्रवारी चंद्रपूर शहरात गणरायाला निरोप देण्यात आला. दरवर्षी दुपारपासूनच गणेश मंडळांच्या मूर्तीची मुख्य मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाविकांची गर्दी असते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजले तरी मिरवणूक गांधी चौकातून समोर सरकली नव्हती. पोलीस बंदोबस्त असला तरी गणेश मंडळ कार्यकर्ते डीजेच्या तालावर तिथेच थिरकत होते. सायंकाळचे सात वाजले, तरी जयंत टॉकीजपर्यंत मिरवणूक पोहोचली नव्हती. गणेश मंडळाची ही संथ चाल पाहून पोलीस गणेश मंडळाला वेळेत विसर्जन करा, असे आवाहन करीत होते.
हेही वाचा : यवतमाळ : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू ; दिग्रस तालुक्यातील घटना
‘चंद्रपूरचा राजा’ गणेश मंडळ आणि पोलिसांमध्ये वाद
शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास जयंत टॉकीज परिसरात ‘चंद्रपूरचा राजा’ गणेश मंडळाची मिरवणूक आली, त्याचवेळी मागे असलेल्या गणेश मंडळांना समोर नेण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. यावरून चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ व पोलिसांमध्ये वाद झाला. वाद चिघळल्याने पोलिसांनी भाविकांवर लाठीमार केला. दरम्यान, मिरवणूक जटपुरा गेट येथे येताच चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष दिपक बेले व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. लाठीमार केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली. यानंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे स्वतः घटनास्थळी आले. त्यांनी शिपाई आदेश रामटेके यांना निलंबित केले. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी मार्ग मोकळा केला. चंद्रपूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रथमच अशी घटना घडली.