अकोला : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून नागरिक आणि पोलिसांमधील सुसंवाद वाढण्यासह माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी आता हायटेक पावले उचलण्यात आली आहेत. पोलिसांनी आता ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ ही सुविधा सुरू केली. या माध्यमातून नागरिकांना २४ तास पोलीस सेवांचा लाभ घेता येईल.’स्मार्ट पोलिसिंग’ अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अकोला पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी एक नवीन डिजिटल माध्यम सुरू केले.

‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’ या आधुनिक सुविधेमुळे नागरिकांना आता पोलिसांकडून पुरविल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि सुविधा विषयी माहिती मिळवणे अधिक सोयीस्कर होईल. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते ‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’चे अनावरण करण्यात आले. हे चॅटबॉट वापरण्यास अत्यंत सोपे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’चा असा करा वापर आपल्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप उघडून ९४०४६९१०२२ हा क्रमांक आपल्या संपर्क यादीत सेव्ह करावा लागेल. या क्रमांकावर ‘नमस्कार’ असा मॅसेज पाठवताच हा चॅटबॉट भाषा निवडण्याचा पर्याय देईल. आता मराठी किंवा इंग्रजी भाषेतून माहिती मिळवू शकता. भाषा निवडल्यानंतर विविध प्रकारच्या सेवा आणि सुविधांची यादी दिसेल. अकोला पोलिसांबद्दल माहिती हवी असेल, तर ‘१’ हा पर्याय निवडावा लागेल. आपत्कालीन संपर्क क्रमांकांसाठी ‘२’ हा पर्याय निवडता येईल. इतर विविध सेवांच्या माहितीसाठी संबंधित आकडे निवडून ‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’ उपयोग करता येईल.

अनेक उपयुक्त माहिती मिळणार

जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, सामाजिक माध्यमांचे खाते, लोकेशन आदी माहिती उपलब्ध असेल. ई-चालान, पारपत्र सेवा, चारित्र्य पडताळणी, सायबर जनजागृती, हरवलेले मोबाइल तक्रार नोंदणी प्रक्रिया आणि इतर अनेक उपयुक्त माहिती ‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’ माध्यमातून नागरिकांना मिळणार आहे. २४ तास कुठूनही या सेवेचा लाभ घेता येईल. ‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’ हा भुषण अरूण रंभापुरे, सायबर सेलच्या प्रभारी अधिकारी सपोनि कान्होपात्रा बन्सा, पो.अंम.स्वप्निल ग. दामोदर यांनी तयार केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले ‘अकोला पोलीस व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांसह पोलिसांसाठी देखील हे जलद माध्यम फायदेशीर ठरणार आहे