फक्त वाहनचालकांवर कारवाई; तपास थंडबस्त्यात
मंगेश राऊत, नागपूर</strong>
राज्य सरकारने गोवंश तस्करीवर बंदी घातल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेक कारवाया करण्यात येत आहेत. मात्र, या कारवायांमध्ये सापडलेल्या वाहनचालकांना अटक करून प्रकरण बंद करण्यात येते. याचा खोलवर तपास करून मुख्य सूत्रधारांपर्यंत कधीच पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करीत नाही, हे विशेष.
गोवंश व गोमांस तस्करी करण्यासाठी नागपूरची ओळख आहे. शहरातील पाचपावली, यशोधरानगर आणि कामठी परिसरातून मोठय़ा प्रमाणात हैदराबादला गोवंश व गोमास तस्करी केली जाते. यात कुख्यात गुंडही गुंतले आहेत. प्रामुख्याने यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सैय्यद मोबीन अहमद, शफीक अंसारी, समीम अहमद, अफरोज अंसारी हे मोठे तस्कर आहेत. मोबीन याच्याविरुद्ध महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. तीन -चार महिन्यांपूर्वी त्याच्या मालकीचे वाहन शारदा कंपनी चौकात जाळण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मानकापूर पोलिसांवर हल्ला करून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न ज्या वाहनाने झाला ती तवेराही त्याच्या गोवंश तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.
परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांचे पथक गोवंश तस्करांविरुद्ध कारवाई करते. दोन दिवसांपूर्वी पथकाने कामठीत दोन ट्रक गोमांस पकडले. मात्र, वाहन जप्त करून चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. पण, या तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण, हे तपासण्यात येत नाही. पोलीस अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक या तपासाकडे दुर्लक्ष करीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
नोटरीवर वाहनांची हेराफेरी
मोबीनसारखे तस्कर कधीच स्वत:च्या नावावर वाहन खरेदी करीत नाही. ते केवळ वाहनांची चालकांच्या नावाने नोटरी करतात व गोवंशी तस्करीसाठी वापरतात. शिवाय चोरीच्या वाहनांची नागालँडच्या राज्याच्या नावाने बनावट दस्तावेज तयार करतात. लोधीखेडा येथील पोलीस ठाण्यात त्याची जवळपास १० वाहने जप्त आहेत. अशा प्रकरणांचा खोलवर तपास केला तर खरे तस्कर पकडले जातील व गोवंश तस्करीवर नियंत्रण मिळवून गोधन जतन करता येऊ शकेल.
तरुणांचा चोरीसाठी वापर
आता गोवंशची बाजारात विक्री होत नाही. त्यामुळे शेतात व रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांची चोरी करण्यासाठी तरुणाईला आपल्यासोबत जोडतात. एका जनावरासाठी तरुणांना दोन ते तीन हजार रुपये देतात. त्यामुळे तरुणांना खर्च भागवण्यासाठी पैसा मिळतो व जनावर चोरीची फारशी तक्रार होत नाही. कामासाठी रायपूर, भिलाई, येथून तरुणांना नागपुरात आणले जाते. छत्तीसगड व मध्यप्रदेशात जनावर चोरी करून ते नागपूरमार्गे हैदराबाद येथे पोहोचवले जातात.
गोवंश तस्करीमागे कोण आहे, याचा तपास केला जात आहे. त्यांच्यावर पोलिसांची नजर आहे. वाहनचालकांच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्स तपासून त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करून कारवाई करण्यात येईल.
– हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-५