लोकसत्ता टीम
नागपूर : पोलीस विभागात शिस्तीला खूप महत्व आहे. वरिष्ठांच्या आदेश पाळणे किंवा वरिष्ठांना मान-सन्मान कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असते. मात्र, वाडी पोलीस ठाण्यातील एका बीट मार्शलने एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला रात्रीच्या सुमारास भररस्त्यात चांगला चोप दिला. अधिकाऱ्याच्या डोक्याला जखम झाली असून कानाचा पडदासुद्धा फाटला आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन वाडी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक राजेशकुमार हे नक्षलविरोधी अभियान, नागपूर येथे कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास ते ग्रॅंड हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी तेथे दोन ग्राहकांमध्ये किरकोळ वाद झाला. निरीक्षकाने पुढाकार घेत मध्यस्थी केली व त्यांच्यातील वाद मिटविला. प्रकरण शांत झाल्यावर सर्वजण आपापल्या टेबलवर बसले. दरम्यान, कुणीतरी वाडी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे बिट मार्शल पंकज मडावी आणि अन्य एक कर्मचारी बारमध्ये पोहोचले. त्यांनी वाद झाल्याबाबत विचारायला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक जवळच उभे असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना खडसावले. ‘मी हा वाद सोडवला. इतका उशिर लागतो का यायला?’ अशी विचारणा केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
पंकज मडावी यांनी त्या अधिकाऱ्याला वाडी पोलीस ठाण्यात चालण्यास सांगितले. तर पोलीस अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांवर आरडाओरड केली आणि पोलीस ठाण्यात येण्यास नकार दिला. त्यामुळे राजेश यांना पुन्हा मारहाण करण्यात आली आणि बळजबरीने पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस अधिकारी आरडाओरड करीत होते. त्यामुळे पोलीस शिपायी पंकजने रागाच्या भरात पोलीस ठाण्यातही राजेश यांना बेदम मारहाण केली. निरीक्षकाने स्वत:ची ओळखदेखील सांगितली. मात्र, कर्मचाऱ्यांनी काहीच ऐकले नाही. त्यात निरीक्षकाच्या कपाळाला जखम झाली व कानाचा पडदा फाटला. अखेर कर्मचाऱ्याने मध्यस्थी केल्यामुळे पोलीस निरीक्षकाला सोडण्यात आले. निरीक्षकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
पीडित पोलीस निरीक्षकला दोनदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तसेच गडचिरोलीमध्ये त्यांची ‘सिंघम अधिकारी’ म्हणून ओळख होती. पोलीस अधिकारी असल्याचे सांगूनही मारहाण झाल्यामुळे ते चिडले. त्यांनी पोलीस अंमलदार पंकज मडावी यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पंकजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार राजेश तटकरे यांनी दिली.