गोंदियात दोन मजुरांच्या अपघाती मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दोन मजुरांच्या मृत्यूनंतर आंदोलन सुरु असताना पोलीस पांगवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परने बुधवारी (ता.१५) सकाळी नऊच्या सुमारास महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक दिली होती. या अपघातात महालगाव प्रशांत धर्मराज आगाशे (वय २४) याचा जागीच मृत्यू, तर गुलशन बळीराम कावळे (वय १९) या गंभीर जखमीचा रात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर महालगावासी संतप्त झाले.

जमावाने प्रशांत आगाशे याचा मृतदेह रात्री दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेला. शिवाय गुरुवारी (ता. १६) सकाळी ११ वाजेपासून मृत गुलशन कावळे याचा मृतदेह घेऊन महालगाव येथे चक्काजाम केले. जमावाने महामार्ग रोखून धरल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी दुपारी पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे जमाव आणखी उग्र झाला व जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. यात पोलीस अधिकारी व काही कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.