अमरावती : येथील पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी सलग एक तास दोन मिनिटे पाण्यात उभ्या स्थितीत राहण्याचा विक्रम पूर्ण केला असून आशिया बूक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे.
शहर पोलीस विभागात कार्यरत असणारे प्रवीण आखरे हे उत्तम जलपटू आणि योगाभ्यासक आहेत. आज ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी ३० मिनिटे पाण्यात उभे राहण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी शहर पोलीस दलाच्या जलतरण तलावात उतरले होते. ही कामगिरी त्यांनी तीस मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक तास दोन मिनिटे पाण्यात उभे राहण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे.
हेही वाचा >>> धक्कादायक..! अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाचा खून
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनोज तत्त्ववादी यांनी प्रविण आखरे यांच्या या दोन्ही विक्रमांची घोषणा केली. ५१ ते ६० वयोगटात पाण्यात सलग एक तास दोन मिनिटे उभे राहण्याचा विक्रम आजवर कोणीही केलेला नाही. या वयोगटात हा नवा विक्रम स्थापन करणारे अजय आखरे हे एकमेव असल्याचे मनोज तत्ववादी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
या विक्रमी कामगिरीबाबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आपण पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच हा विक्रम नोंदविण्यासाठी सराव करू शकलो, अशी प्रतिक्रिया प्रवीण आखरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. प्रवीण आखरे यांनी यापूर्वी २८ मे रोजी त्यांनी पाण्यामध्ये अर्धा तास योगासन करण्याचा विक्रम केला होता. त्या विक्रमाची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे.